अल्पवयीन मावसबहिणीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या भावाला दहा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:10+5:302021-03-22T04:09:10+5:30
पुणे : अल्पवयीन मावस बहिणीलाच पळवून नेत तिला लग्नाचे आमिष दाखवित अत्याचार करणाऱ्या भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि ...
पुणे : अल्पवयीन मावस बहिणीलाच पळवून नेत तिला लग्नाचे आमिष दाखवित अत्याचार करणाऱ्या भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद केले आहे.
ही घटना १ मार्च २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नवी सांगवी परिसरात घडली. याबाबत ४० वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी हा हदगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी आहे. गेल्या सहा वर्षांपासून कामानिमित्त तो त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने १५ वर्षीय अल्पवयीन पीडितेला फूस लावून पळवून नेत भाड्याच्या खोलीत ठेवले. तुझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे खोटे सांगून तिच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी त्याला अटक करत दोषारोपत्र दाखल केले.
याप्रकरणात सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. आरोपीचे घटनेच्या पूर्वीपासून पीडितेशी प्रेमसंबंध होते. त्यास तिची संमती होती. यास आरोपीच्या वतीने केलेल्या युक्तिवादाला अॅड. घोगरे पाटील यांनी विरोध केला. आरोपीच्या म्हणण्यानुसार पीडितेची संमती असली तरी ती अल्पवयीन आहे. त्यामुळे कायद्याने तिची संमती ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे आरोपीस बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. ती ग्राह्य धरत न्यायालयाने बाललैगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४ व ६, भा. दं. वि. कलम ३७६ नुसार आरोपीस शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस संजय बनसोडे व राजेंद्र सोनवणे यांनी मदत केली.