अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी
By नम्रता फडणीस | Published: October 13, 2023 04:12 PM2023-10-13T16:12:49+5:302023-10-13T16:13:10+5:30
दंडाची शिक्षाही देण्यात आली असून न भरल्यास ८ दिवस कारावास भोगावा लागणार
पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, तसेच दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त आठ दिवस कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पंडित बालाजीराव म्हस्के असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना मे ते १९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत मांजरी भागात घडली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडित कुटुंबियांनी मांजरी भागात भाड्याने घर घेतले हाेते. आरोपीने ‘तु मला आवडतेस आणि तू मला हवे ते करू न दिल्यास तुला आणि तुझ्या भावाला जीवे ठार मारेन' अशी धमकी दिली. घराच्या मागे कपडे धुण्यासाठी गेली असताना तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ॲट्राॅसिटी, बलात्कार, धमकाविणे कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने बलात्कार, धमकाविणे याच्या कलमानुसार शिक्षा सुनावली. तर, अँट्रॉसिटीच्या कलमातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.