Pune: कर्ज मंजूर करतो म्हणत भाडेकरूचा घरमालकाला साडे नऊ लाखांना गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: August 17, 2023 07:05 PM2023-08-17T19:05:40+5:302023-08-17T19:06:26+5:30
साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार एरंडवणे परिसरात घडला...
पुणे : जुन्या भाडेकरूने आपल्या मित्रांसोबत मिळून वेगवेगळ्या प्रकारचे लोन मंजूर करून देतो, असे सांगून घरमालकाला साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार एरंडवणे परिसरात घडला. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ३० मे २०२३ दरम्यान घडला.
याबाबत श्रीपाद पांडुरंग पाटील (वय ५८, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी सचिन शिरेकर हा तक्रारदार श्रीपाद पाटील यांचा जुना भाडेकरू आहे. सागर चिरंजीलाल पुरोहित (वय ५३, रा. बुलढाणा) आणि सचिन लक्ष्मण शिरेकर (रा. बुलढाणा) यांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाइकांना वेगवेगळ्या प्रकारचे लोन मंजूर करून देतो असे सांगितले.
जुना भाडेकरू असल्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रोख रक्कम आणि गुगल पे वर एकूण ९ लाख ५३ हजार रुपये घेतले. मात्र लोन मंजूर न झाल्याने पाटील यांनी विचारणा केली असता संबंधित रक्कम स्वतःच्या फायद्याकरता वापरल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. याप्रकरणी दोघा आरोपींवर अलंकार पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. १६) आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. चव्हाण पुढील तपास करत आहेत.