रणबीर कपूरविरोधात भाडेकरूचा ५० लाखांचा दावा, ट्रम्प टॉवरमध्ये सदनिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 01:43 AM2018-07-21T01:43:21+5:302018-07-21T01:44:12+5:30
भाडेकराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत भाडेकरूने अभिनेता रणबीर कपूर याच्या विरोधात ५० लाखांचा दावा ठोकला आहे.
पुणे : भाडेकराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत भाडेकरूने अभिनेता रणबीर कपूर याच्या विरोधात ५० लाखांचा दावा ठोकला आहे.
रणबीर कपूरचा कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरमधील अपार्टमेंट आॅक्टोबर २०१६ मध्ये भाड्याने दिले आहे. मात्र, भाडेकराराचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, भाडेकरूने रणबीरविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या शीतल सूर्यवंशी यांनी रणबीर कपूरचे कल्याणीनगर येथील अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ६ हजार ९४ स्क्वेअर फुटांच्या अपार्टमेंटसाठी भाडेकरार झाला होता. पहिल्या वर्षासाठी दरमहा ४ लाख, तर दुसºया वर्षासाठी ४ लाख २० हजार रुपये भाडे ठरले होते. तर करार करताना सूर्यवंशी यांनी डिपॉझिट म्हणून २४ लाख रुपये दिले होते.
मात्र, रणबीर कपूरने मुदतीपूर्वीच करार रद्द केला. त्यामळे आपले कुटुंब बेघर झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. याबाबत सूर्यवंशी यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. ५० लाख ४० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, तसेच अनामत रकमेवरील व्याज म्हणून १ लाख ८० हजार रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
रणबीरने सर्व
आरोप फेटाळले
रणबीर कपूरने हे सर्व आरोप फेटाळत न्यायालयात आपले म्हणणे मांडले आहे.
सूर्यवंशी यांना फ्लॅट रिकामा करण्यास सांगितलेले नाही, तर भाडेपत्रातील काही भाग नव्याने करत आहे, असे रणबीरने स्पष्ट केले.
रणबीरच्या दाव्यानुसार शीतल सूर्यवंशी यांनी मुदतीपूर्वीच घर सोडले आहे. त्यामुळे त्यांच्या डिपॉझिटमधील ३ महिन्यांचे भाडे कापले आहे.
या खटल्याची पुढील
सुनावणी २८ आॅगस्ट रोजी होणार आहे.