पीपीपी तत्वावरील रस्ते अन् उड्डाण पुलाच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:17+5:302021-07-20T04:10:17+5:30
पुणे : मुंढवा-खराडी आणि हडपसर परिसरातील रस्ते आणि उड्डाणपूल पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याची निविदा अंतिम टप्प्यात असून या विकसनाकरिता ...
पुणे : मुंढवा-खराडी आणि हडपसर परिसरातील रस्ते आणि उड्डाणपूल पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याची निविदा अंतिम टप्प्यात असून या विकसनाकरिता डेव्हलपमेंट क्रेडिट नोट देण्यात येणार आहे. क्रेडिट नोट केवळ बांधकाम परवानगीसाठीच्या शुल्कासाठी मर्यादित न ठेवता या नोटचा मिळकत कर, आकाशचिन्ह परवाना शुल्क, पाणी पुरवठा मीटर शुल्क, मालमत्ता व्यवस्थापन विभागासह पालिकेच्या सर्व खात्यांकडील देय शुल्कासाठी वापर करता येणार आहे. स्थायी समितीच्या या प्रस्तावाचा समावेश करून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
मुंढवा, खराडी आणि हडपसर परिसरातील आठ रस्ते तसेच दोन उड्डाणपुलांची कामे पीपीपी तत्त्वावर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे ५९२ कोटी रुपयांच्या या कामांसाठी विकसकांना डेव्हलपमेंट क्रेडिट नोट देण्यात येणार आहे. या क्रेडिट नोटसाठी दरवर्षी २०० कोटी रुपयेच खर्ची टाकता येतील, अशी अट पालिकेने घातली आहे. क्रेडिट नोटचा वापर केवळ बांधकाम शुल्कासाठी करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. मात्र, केवळ बांधकाम शुल्कासाठी क्रेडिट नोटचा वापर करण्याच्या अटीवर विकसकांनी नाराजी व्यक्त केली होती.
संबधित विकसक बांधकाम शुल्कासोबतच मिळकत कर, आकाशचिन्ह परवाना शुल्क, पाणी पुरवठा मीटर शुल्क, मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडील देयकांसाठीही क्रेडिट नोटचा वापर करू शकतील, असा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये मंजूर केला. या धोरणाला महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. लवकरच या कामांच्या निविदा काढण्यात येणार आहेत.