निविदेतील अटी, शर्तींचा निर्णय प्रलंबित

By admin | Published: June 3, 2017 02:51 AM2017-06-03T02:51:34+5:302017-06-03T02:51:34+5:30

महापालिकेच्या दवाखान्यांसाठीच्या औषध खरेदी निविदेच्या अटी, शर्तीमध्ये बदल करण्याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत काही

Tender Terms, Terms Of Decision Pending | निविदेतील अटी, शर्तींचा निर्णय प्रलंबित

निविदेतील अटी, शर्तींचा निर्णय प्रलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या दवाखान्यांसाठीच्या औषध खरेदी निविदेच्या अटी, शर्तीमध्ये बदल करण्याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत काही निर्णय होऊ शकला नाही. अटी, शर्तीमध्ये शिथिल करण्याबाबतचा स्थायी समितीचा लेखी ठराव मिळाल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. यात अनुभवाच्या अटीवर संक्रांत येण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधांचा साठाच नाही. शहरी गरीब तसेच आजी-माजी नगरसेवक, कर्मचारी यांच्यासाठी म्हणून असाध्य व सर्वसामान्य आजारांवरची औषधेही महापालिकेच्या एका योजनेत विनामूल्य दिली जातात. यासाठीची औषधखरेदी आधीच लांबलेली असताना आता पुन्हा स्थायी समितीने पूर्ण झालेली निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या एका विशिष्ट निविदाधारकासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून दबाव येत असल्याने असा निर्णय झाला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळेच यापूर्वीच्या निविदेतील अटी, शर्ती शिथिल करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, यासंबंधी सुरू असलेल्या चर्चेमुळे आरोग्य विभागाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागातील विविध प्रकारच्या खरेदीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पर्चेस कमिटीची बैठक घेतली. त्या या समितीच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्याशिवाय डॉ. अंजली साबणे, गाडीखाना रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय वावरे, कमला नेहरू रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राहुल गागरे, डॉ. विद्या गायकवाड, डॉ. अनघा जोग आदी या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत निविदा प्रक्रियेसंदर्भात आतापर्यंत झालेल्या घटनांचा आढावा घेण्यात आला. त्यात फेरनिविदा काढण्याचा निर्णय का झाला यावरही चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली.

स्थायी समितीने केलेल्या फेरनिविदा काढण्याच्या ठरावाची लेखी प्रतच अद्याप आरोग्य विभागाला उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अटी, शर्ती बदलण्याबाबत बैठकीत चर्चा झाली नाही, पण अन्न व औषध प्रशासनाने विशिष्ट प्रकारच्या औषधांसाठी परवाना असण्याची जी अट टाकली आहे, त्यात काहीही बद करू नये, अशी सूचना उगले यांनी बैठकीत केली. स्थायी समितीच्या ठरावाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर अनुभव किंवा अन्य अटींबाबत विचार करू, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत काही निर्णयच झाला नसल्यामुळे आता महापालिकेची ही औषध खरेदी प्रदीर्घ काळासाठी लांबणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. किमान महिनाभर तरी अजून आवश्यक औषधे उपलब्ध होणार नाहीत, असे दिसते आहे.
काही माजी पदाधिकारी तसेच नगरसेवकांची व सर्वसामान्य गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्यांना खुल्या बाजारातून त्यांच्यासाठीची औषधे घेणे परवडत नाही. त्यामुळे याबाबत लवकर काय तो निर्णय व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या वतीने आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे.

Web Title: Tender Terms, Terms Of Decision Pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.