तेंडुलकर आजोबा झाले सांता
By admin | Published: December 22, 2016 02:32 AM2016-12-22T02:32:27+5:302016-12-22T02:32:27+5:30
सांताचा वेश परिधान करून एक व्यक्ती बालचमूंच्या अचानक पुढ्यात आली अन् सर्वांच्या चेहऱ्यावरच्या कळ्या आपसूकच खुलल्या!
पुणे : सांताचा वेश परिधान करून एक व्यक्ती बालचमूंच्या अचानक पुढ्यात आली अन् सर्वांच्या चेहऱ्यावरच्या कळ्या आपसूकच खुलल्या! हा सांता म्हणजे आपले लाडके व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आहेत हे कळले, तेव्हा तर निरागस मुलांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. अन् मग या सांताकडून चॉकलेट, आवडत्या वस्तू घेण्यासाठी मुलांची धांदल उडाली.
ख्रिसमस ट्री, बेल, फुग्यांनी सजवलेले सभागृह अशा प्रसन्न वातावरणात जीवधारा शाळेतील विशेष मुलांनी लाडक्या तेंडुलकर आजोबांसोबत ख्रिसमस पार्टी साजरा केली.
नाताळ सणाच्या निमित्ताने मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, जीवनधारा मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता शिंदे, यश पंडित व मोठ्या संख्येने विद्यार्थी व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
मंगेश तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी सांताची वेशभूषा केली होती. या वेळी त्यांनी विशेष मुलांना बक्षिसांचे वाटप केले; त्याचबरोबर मुलांसोबत ‘जिंगल बेल’ गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या उपस्थितीने एक वेगळाच माहोल सभागृहात निर्माण झाला.
या वेळी मुलांना विविध खेळणी, खाऊ, कपडे यांचे वाटप फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
(प्रतिनिधी)