‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यांचा ताण

By admin | Published: February 14, 2015 11:53 PM2015-02-14T23:53:48+5:302015-02-14T23:53:48+5:30

शहरात केंद्र व राज्यातील मंत्री व व्हीआयपींच्या बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पोलिसांवर तसेच शासकीय यंत्रणेवर पडत आहे.

Tension of VIP visits | ‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यांचा ताण

‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यांचा ताण

Next

पुणे : शहरात केंद्र व राज्यातील मंत्री व व्हीआयपींच्या बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पोलिसांवर तसेच शासकीय यंत्रणेवर पडत आहे. १ नोव्हेंबर २०१४ ते १३ फेब्रुवारी २०१५ या १०५ दिवसांच्या कालावधीमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मंत्री व व्हीआयपींचे १७० दौरे झाले आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक दौरे खासगी कार्यक्रमांसाठी झाल्याचे चित्र आहे.
पुण्यात पुस्तक प्रकाशनापासून ते शैक्षणिक संस्थांचे कार्यक्रम, लग्न समारंभापर्यंतही राज्याचे तसेच केंद्राचे मंत्रिमहोदय सहभागी होताना दिसत आहेत. पुण्यातील कार्यक्रमांच्या रेलचेलीमध्ये मंत्रिगण, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सहभागी होणार म्हटले, की पोलीस, महसूल, राजशिष्टाचार विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची धांदल उडते. कार्यक्रमांच्या आयोजकांनी व्हीआयपींच्या सोयीनुसार कार्यक्रमाच्या तारखा ठरवलेल्या असतात. त्यानुसार या सर्व विभागांना दौऱ्याचे नियोजन करावे लागते. विमानतळावर स्वागताला हजर राहण्यापासून ते पुन्हा रवाना होईपर्यंत अधिकाऱ्यांना शिष्टाचार पाळावा लागतो. त्या दिवशी दिवसभर या व्हीआयपींच्या सेवेत तैनात राहावे लागते.
पुण्यात राज्य मंत्रिमंडळातील तीन व केंद्रातील एक मंत्री आहेत. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जाताना पुणे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या दौऱ्यांचाही समावेश पुणे दौऱ्यातच होतो. मागील १०५ दिवसांच्या कालावधीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी-माजी केंद्र व राज्यातील मंत्री यांचे १७० पेक्षा अधिक दौरे झाले आहेत. यासोबत राज्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, हायरिस्क कॅटेगिरीमधील व्यक्ती, संसदीय समित्यांचे सदस्यांचेही दौरे होत असतात. धार्मिक गुरू दलाई लामा यांचे तीन, संत गुरमीत यांचे दोन, पालघरचे पोलीस अधीक्षक यांचे तीन दौरे झाले आहेत. तसेच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, गुजरात व उत्तर प्रदेशाचे राज्यपाल, बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरुण जेटली, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहमंत्रालयाचे सचिव अमिताभ राजन यांचेही दौरे झाले आहेत. (प्रतिनिधी)

एका ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या बंदोबस्तासाठी १०० च्या आसपास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवावा लागतो. जर एका व्यक्तीचे दिवसभरात तीन अथवा चार कार्यक्रम असतील तर चारही ठिकाणी वेगळा बंदोबस्त ठेवावा लागतो. हा बंदोबस्त ही अतिमहत्त्वाची व्यक्ती शहराबाहेर रवाना होईपर्यंत सोडण्यात येत नाही. विनाअडथळा प्रवासाकरिता विशेष वाहतूक पोलीस नेमावे लागतात.

राज्यपाल सी. विद्यासागर राव०६
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस०९
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील१५
सिक्कीम राज्यपाल श्रीनिवास पाटील१४
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी०६
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार०६
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे०५
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण०६
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार०७

Web Title: Tension of VIP visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.