'आका'वर मकोका, परळीत तणाव; पंकजा मुंडे थेट गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:49 IST2025-01-15T19:47:32+5:302025-01-15T19:49:04+5:30

वाल्मीक कराडच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता परसरली असून याचे पडसाद परळी शहरासह बीड जिल्ह्यातील काही भागांत उमटू लागले आहेत.

Tensions in Parli after MCOCA to walmik karad Pankaja Munde will call devendra fadnavis | 'आका'वर मकोका, परळीत तणाव; पंकजा मुंडे थेट गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

'आका'वर मकोका, परळीत तणाव; पंकजा मुंडे थेट गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

BJP Pankaja Munde: पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचा खुनाच्या गुन्ह्यातही समावेश करण्यात आला असून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. एसआयटीने वाल्मीक कराडला आज कोर्टात हजर केल्याने कोर्टाने कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कराडभोवती कारवाईचा फास आवळला जाऊ लागल्यानंतर त्याच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता परसरली असून याचे पडसाद परळी शहरासह बीड जिल्ह्यातील काही भागांत उमटू लागले आहेत. याबाबत भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत मी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

परळीत तणाव निर्माण झाला असल्याचं सांगत पत्रकारांकडून पंकजा मुंडे यांना बारामती इथं प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी विमानात होते, त्यामुळे परळीत काय घडलं, याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. मी नियोजित कार्यक्रमात आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत आहे. त्यामुळे इतर गोष्टी मला मॅटर करत नाहीत. रोजचं काम माझ्यासाठी मॅटर करतं. परळीत तणाव निर्माण झाला असेल तर निवळावा यासाठी मी गृहमंत्र्यांशी बोलेन," अशी भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आहे.

परळीत नेमकं काय घडतंय?

वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही  परळी येथील बाजारपेठ बंद आहे. मंगळवारी तीन वाजता काही कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार परळीची बाजारपेठ काल दुपारपासून बंद होती. आज बुधवारी, दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडलेली नव्हती. शहरातील आडत बाजारपेठ ,किराणा लाईन मेन रोड, राणी लक्ष्मीबाई टावर ,नेहरू चौक, स्टेशन रोड व अन्य ठिकाणची दुकाने बंद असल्याचे दिसून आली. काही ठिकाणचे औषध दुकाने चालू होती. शहरातील हॉटेल्स ही बंद आहेत.

दरम्यान, वाल्मीक कराड याच्या पांगरी गावात बुधवारी सकाळी बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून गावातील ५ समर्थक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. वाल्मीक कराडला न्याय द्यावा व त्याच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी आमदार सुरेश धस व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. 

Web Title: Tensions in Parli after MCOCA to walmik karad Pankaja Munde will call devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.