व्हाॅट्सॲपद्वारे दहावीचे सर्वाधिक मूल्यमापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:41+5:302021-05-13T04:11:41+5:30
पुणे : कोरोना काळात राज्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याबरोबरच विविध पद्धतीने त्यांचे मूल्यांकन केले आहे. त्यात सर्वाधिक ...
पुणे : कोरोना काळात राज्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याबरोबरच विविध पद्धतीने त्यांचे मूल्यांकन केले आहे. त्यात सर्वाधिक १२ हजार ९३१ शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन व्हॉटसॲपद्वारे केले आहे. राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ‘दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळा तयार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात राज्यातील शाळांनी वर्षभर कशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले, हे जाणून घेतले. शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाइन टेस्ट, व्हॉट्स्ॲप, ऑनलाइस सेशन, ऑफलाइन टेस्ट, गृहभेटी, वर्क बुक आणि अन्य पर्याय वापरले. त्यातील बहुतांश शाळांनी व्हॉट्सॲप, ऑनलाइन टेस्ट, ऑफलाइन टेस्ट, वर्क बुक आदी वापरून मूल्यमापन केल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
राज्यातील २५ हजार ९२७ शाळांपैकी ५० टक्के म्हणजेच सुमारे १२ हजार ९३१ शाळा सर्वेक्षणात सहभागी झाल्या. यात सर्वाधिक शाळांनी व्हॉट्सॲपचा वापर केल्याचे दिसून आले. तब्बल १२ हजार २९८ शाळांनी व्हॉट्सॲपचा तर ९ हजार ९३० शाळांनी ऑफलाइन आणि ९ हजार ७५८ शाळांनी ऑनलाइन टेस्टव्दारे मूल्यमापन केले आहे. तसेच ८ हजार ४०२ शाळांनी विद्यार्थ्यांना वर्क बुक देऊन मूल्यमापन केले आहे.
---
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आज बैठक
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करा किंवा नाही, यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक घेतली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शाळांनी केलेल्या विविध मूल्यमापनाच्या आधारे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याचे शक्यता आहे.