दहावी निकालासाठी करा नववी निकालाचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:08+5:302021-05-25T04:12:08+5:30
पुणे : इयत्ता दहावीच्या निकालाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असून, शिक्षण विभागातर्फे यासंदर्भात शासनाला सादर करण्यात आलेला गोपनीय अहवाल गुलदस्तात ...
पुणे : इयत्ता दहावीच्या निकालाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असून, शिक्षण विभागातर्फे यासंदर्भात शासनाला सादर करण्यात आलेला गोपनीय अहवाल गुलदस्तात आहे. परंतु, दहावीच्या अंतिम निकालासाठी दहावीतील अंतर्गत परीक्षांच्या मूल्यमापनासह नववीतील निकालाचाही विचार करावा, अशी भूमिका मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाकडे मांडली आहे. परंतु, याबाबत न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘एचएससी’सह सीबीएसई, आयसीएसई या बोर्डांनी सुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्व बोर्डांकडून दहावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, एसएससी बोर्डाचा निकाल कसा जाहीर होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “राज्य शासनाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीतील अंतर्गत परीक्षांसह विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीतील निकालाचा सुद्धा आधार घ्यावा. हा प्रस्ताव मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाकडे सादर केला आहे.”
केंद्रीय विद्यालय क्रमांक-२ चे मुख्याध्यापक संजय कुमार पाटील म्हणाले की, सीबीएसई बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केला जात आहे. त्यासाठी शाळेत विषयनिहाय शिक्षकांच्या समित्या स्थापन केल्या आहेत. प्राचार्य उषा मूर्थी म्हणाल्या, “आयसीएसई बोर्डने दिलेल्या सूचनांनुसार इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरू असून प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.”