दहावी-बारावी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोरच उघडल्या जाणार, शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:11 PM2022-02-23T12:11:17+5:302022-02-23T12:14:15+5:30
राज्य मंडळातर्फे येत्या मार्च-एप्रिलमध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत
राहुल शिंदे
पुणे: इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात व पेपर फुटीच्या घटना घडू नयेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षापासून प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक पाकीट विद्यार्थ्यांच्या समोर फोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच प्रत्येक पाकिटात केवळ २५ प्रश्नपत्रिकाच असणार होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता कमी होणार आहे, असे राज्य मंडळाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
राज्य मंडळातर्फे येत्या मार्च-एप्रिलमध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे यंदा परीक्षा केंद्रांची संख्या तब्बल ३० हजार ९५४ पर्यंत वाढली आहे. मुख्य परीक्षा केंद्रातून उपपरीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिकांची पाकिटे पोहोचवताना ती फोडली जाऊ शकतात. त्यामुळेच गोपनीयतेचा भाग म्हणून राज्य मंडळातून पाठवलेले प्रश्नपत्रिकेचे पाकीट थेट विद्यार्थ्यांसमोरच उघडले जाईल, यांची खबरदारी घेतली आहे.
राज्य मंडळाकडून मुख्य परीक्षा केंद्रावर थ्री लेअर पाकिटात प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. या प्रश्नपत्रिका मुख्य केंद्रातून उपकेंद्रांवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी ४० मिनिटे आधी पोहोचविल्या जातील. पूर्वी प्रश्नपत्रिकेच्या पाकिटात ५० प्रश्नपत्रिका दिल्या जात होत्या. या मुख्य केंद्रावर केंद्र संचालकांच्या उपस्थितीत प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्येनुसार दुसऱ्या पाकिटात भरल्या जात होत्या परंतु आता त्यात बदल करण्यात आला असून एका वर्गात २५ किंवा २५ पेक्षा कमी विद्यार्थी असले तरी प्रत्येक पाकिटात २५ प्रश्नपत्रिका दिलेल्या असतीत. केंद्र संचालक व पर्यवेक्षक हे विद्यार्थ्यांसमोर हे पाकीट उघडतील, असे नियोजन यंदा राज्य मंडळाने केले आहे.
यावर्षी कोरोनामुळे प्रत्येक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रत्येक पाकिटात केवळ २५ प्रश्नपत्रिकाच भरल्या जातील. या प्रश्नपत्रिकेचे पाकीट थेट विद्यार्थ्यासमोर फोडले जाईल.
शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ
केंद्र संचालक, पर्यवेक्षक व विद्यार्थी यांच्यासमोर परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडले जाणार आहे. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यासमोर पाकीट फोडले जाणार असल्याने परीक्षा सुरु होण्यापूर्वी सोशल • मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल होणार नाही.
-महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ