चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत आज संपुष्टात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:20 AM2021-05-05T04:20:10+5:302021-05-05T04:20:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत उद्या (दि. ५) संपुष्टात येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत उद्या (दि. ५) संपुष्टात येत आहे. मात्र, कोरोनामुळे महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभाच न झाल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकलेला नाही. त्यामुळे नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत जुनेच कारभारी कामकाज पाहाणार आहेत.
चित्रपट महामंडळाच्या घटनेनुसार निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वी एक महिना आधी सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. त्या सभेमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. मात्र, लोकांनी एकत्र येण्यावर शासकीय नियमानुसार बंधने आहेत. या नियमाच्या फेऱ्यात सभा आणि निवडणूक अडकली आहे.
यापार्श्वभूमीवर चित्रपट महामंडळाने धर्मादाय आयुक्तांना एप्रिलमध्येच पत्र दिले आहे. त्या पत्रात सरकारी नियमावलीनुसार सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकत नाही. त्यामुळे निवडणुका घेता येणे शक्य नाही. याचा अर्थ आता नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत सध्याची विद्यमान कार्यकारिणीच कार्यांन्वित राहाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, कोरोना काळात ग्रामपंचायत, बिहारसह पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या. मात्र, महाराष्ट्र साहित्य परिषदसारख्या संस्थांनी कोरोनाचे कारण पुढे करीत निवडणुकांनाच फाट्यावर मारत संस्थांवरचे आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक ही वेळेत आणि सरकारी नियमानुसार घेण्यात यावी, अशी मागणी विभागाने कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतु, उद्याच (दि. ५) चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच चित्रपट महामंडळाने धर्मादाय आयुक्तांना पत्र देऊन स्वत:ला सुरक्षित झोनमध्ये टाकले आहे.
-----------------
आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. आम्हाला मुदतवाढ वगैरे काही नकोय. पण फक्त सरकारी नियमाप्रमाणे आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकत नाही. कारण सभेला जवळपास १००० सदस्य असतात. इतक्या लोकांच्या उपस्थितीत सभा घेणे शक्य नाही. सभा घेतल्याखेरीज निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकत नाहीत. महामंडळाच्या घटनेनुसार नवीन कार्यकारिणी येईपर्यंत आमचे काम सुरूच राहील. याबाबत कुणाचा आक्षेप असेल तर त्यांनी धर्मादाय आयुक्त किंवा न्यायालयामध्ये जाऊन परवानगी घेऊन यावी.
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
-------------------------