कंत्राटी आरोग्य कर्मचऱ्यांच्या सेवा संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:33+5:302021-09-03T04:11:33+5:30
बारामती : येत्या काही दिवसांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिम प्रगतीपथावर असताना कोरोनाच्या ...
बारामती : येत्या काही दिवसांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिम प्रगतीपथावर असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती सर्वसामान्यांना सतावत आहे. मात्र, कोविड उपचार केंद्राकरीत नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आलेल्या आहेत. कोविड महामारी आल्यास मनुष्यबळावरच थेट मर्यादा आणल्याने आरोग्यसेवेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
राज्यात मार्च २०२० पासून कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच संस्था स्तरावर कोविड साथ हाताळण्यासाठी मनुष्यबळ मंजूर करण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारने या मनुष्यबळाला मंजुरी दिली नाही. केंद्र शासनाच्या वतीने कोविड १९ अंतर्गत मनुष्यबळाकरीता आवश्यक निधी मंजूर करण्यात आलेला नाही. त्यानुसार या सेवा संपुष्टात आल्या आहेत. या अंतर्गत कोविड उपचार केंद्रासाठी (डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी) नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा ३१ आॅगस्टपासून संपुष्टात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या दोन लाटेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या कोविड उपचार केंद्रावरील कंत्राटी कर्मचारी सेवा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून कोविडच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
दुसरीकडे मनुष्यबळासाठी निधीच मंजूर नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा कोविड प्रोत्साहन भत्तादेखील १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यानेही आता नवीन निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मनुष्यबळ लेखाशीर्षकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून विशेषतज्ज्ञांचे मानधन अदा करण्यात यावे, नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोविड उपचार केंद्र व कोविड केंद्रासाठी घेण्यात याव्यात, कोविड व्यतिरिक्त इतर काम कमी असल्याने सीएचओ, आयुष एमओ, ग्रुप बी- एमओ यांच्या सेवाही कोविड उपचार केंद्रांसाठी घेण्यात याव्यात, स्टोअर आॅफिसर व हॉस्पिटल मॅनेजरची पदे रद्द करावीत, कोविडचे रुग्ण वाढल्यास कोविड व्यतिरिक्त इतर सेवा देत असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार सेवा घेण्याचीही शिफारस आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ. एन. रामास्वामी यांनी एका परिपत्रकाद्वारे केलेली आहे. बारामती शहरात आसपासच्या सहा तालुक्यांतून कोविड रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. त्यावर उपचार करताना उपलब्ध मनुष्यबळात काम करणे अवघड होणार आहे.
————————————
...लहान मुलांवर उपचाराची वेळ आल्यास आवश्यक नियोजन
तिसरी लाट आल्यास आणि दुर्दैवाने यामध्ये लहान मुलांवर उपचार करण्याची वेळ आल्यास या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. नटराजच्या वतीने तारांगणमध्ये लहान मुलांवर मोफत उपचाराची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी लहान मुलांना आनंद देणारी वातावरण निर्मिती, आवश्यक पेंटिंग करण्यात आली आहे. शहरातील बालरोगतज्ञ डॉ. सौरभ मुथा यांची त्यासाठी मदत घेण्यात येणार आहे. सहा कोविड केअर सेंटर तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये १५०० रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन आहे. पुरेसा आॅक्सिजन पुरवठा होईल.-
- किरण गुजर, ज्येष्ठ नगरसेवक