कोविड उपचार केंद्रात नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात; आरोग्यसेवेवर परिणाम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 07:16 PM2021-09-02T19:16:51+5:302021-09-02T19:17:07+5:30
राज्यात तिसरी लाट आल्यास आरोग्यसेवेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती
बारामती : येत्या काही दिवसांत कोरोनाच्या तिस लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, कोविड उपचार केंद्राकरीत नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आलेल्या आहेत. कोविड महामारी आल्यास मनुष्यबळावरच थेट मर्यादा आणल्याने आरोग्यसेवेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
राज्यात मार्च २०२० पासुन कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच संस्था स्तरावर कोविड साथ हाताळण्यासाठी मनुष्यबळ मंजूर करण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारने या मनुष्यबळाला परवानगी दिली नाही. केंद्र शासनाच्या वतीने कोविड १९ अंतर्गत मनुष्यबळाकरीता आवश्यक निधी मंजुर करण्यात आलेला नाही. त्यानुसार या सेवा संपुष्टात आल्या आहेत. या अंतर्गत कोविड उपचार केंद्रासाठी (डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी) नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा ३१ ऑगस्टपासून संपुष्टात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करुन कोविड च्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर निर्माण होणार आहे.
दुसरीकडे मनुष्यबळासाठी निधीच मंजूर नसल्याने कंत्राटी कर्मचा-यांना देण्यात येणारा कोविड प्रोत्साहन भत्ता देखील १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यानेही आता नवीन निर्णय घेतला आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मनुष्यबळ लेखाशीर्षकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून विशेषतज्ज्ञांचे मानधन अदा करण्यात यावे, नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोविड उपचार केंद्र व कोविड केंद्रासाठी घेण्यात याव्यात. कोविड व्यतिरिक्त इतर काम कमी असल्याने सीएचओ, आयुष एमओ, ग्रुप बी- एमओ यांच्या सेवाही कोविड उपचार केंद्रांसाठी घेण्यात याव्यात. स्टोअर ऑफिसर व हॉस्पिटल मॅनेजरची पदे रद्द करावीत, कोविडचे रुग्ण वाढल्यास कोविड व्यतिरिक्त इतर सेवा देत असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार सेवा घेण्याचीही शिफारस आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ. एन. रामास्वामी यांनी एका परिपत्रकाद्वारे केलेली आहे.
————————————
...लहान मुलांवर उपचाराची वेळ आल्यास आवश्यक नियोजन
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले, तिसरी लाट आल्यास आणि दुर्दैवाने यामध्ये लहान मुलांवर उपचार करण्याची वेळ आल्यास या पार्श्वभुमीवर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. नटराजच्या वतीने तारांगण मध्ये लहान मुलांवर मोफत उपचाराची सोय करण्यात येणार आहे. सहा कोविड केअर सेंटर तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये १५०० रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन आहे.