विद्यापीठाकडून नॅक मुल्यांकनाच्या अनुदानासाठी अटी शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 08:34 PM2018-07-17T20:34:07+5:302018-07-17T20:47:03+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने नॅक मुल्यांकनाबाबतच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांना कार्यशाळा, चर्चासत्र, परिषदांच्या आयोजनाच्या अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे. पूर्वी केवळ नॅक मूल्यांकन झालेल्या अथवा पुन:र्मुल्यांकनासाठी अर्ज दाखल केलेल्या महाविद्यालयांना हे प्रस्ताव सादर करता येत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने नॅक मुल्यांकनाबाबतच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅक पुन:र्मुल्यांकनासाठी पात्र असलेली महाविद्यालये, परिसंस्था यांना कार्यशाळा, चर्चासत्र, परिषदांच्या आयोजनासाठी प्रस्तावासोबत चालू शैक्षणिक वर्षात नॅक/एनबीए मूल्यांकन करणार असल्याबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल. हमीपत्र सादर केल्यानंतर त्या महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकनाबाबत काहीही कार्यवाही केली नाही तर ती महाविद्यालये पुढील आर्थिक वर्षात गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत कार्यशाळा आयोजनासाठी प्रस्ताव सादर करण्यास अपात्र राहतील असे परिपत्रक नियोजन व विकास विभागाच्या उपकुल सचिवांनी काढले आहे.