Shirur Accident: शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:27 IST2025-03-24T12:26:49+5:302025-03-24T12:27:25+5:30
कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून, स्विफ्टचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

Shirur Accident: शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
न्हावरे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबातील महिलेचा जीव बचावला आहे. पण या महिलेने आपला पती आणि मुलीला या अपघातात गमावले आहे. या घनतेनंतर संपूर्ण शिरूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्हावरे (ता. शिरूर) येथे न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर सरके वस्तीनजीक रविवारी (दि. २३) नऊच्या सुमारास कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाली. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयानक होता कि स्विफ्ट गाडीचा चक्काचूर झाल्याचे दिसते आहे.
या अपघातात कैलास कृष्णाजी गायकवाड (वय ५०), गौरी कृष्णाजी गायकवाड (१८), गणेश महादेव निर्लेकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुर्गा कैलास गायकवाड या जखमी झाल्या आहेत. कैलास गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनातून तळेगावहून न्हावऱ्याकडे येत असताना त्यांच्या चारचाकी गाडीला कंटनेरने जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातलग गणेश निर्लेकर यांचा मृत्यू झाला, तर कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड जखमी झाल्या आहेत. महिलेने या अपघातात आपला पती आणि मुलीला गमावले आहे.
चालक फरार
गायकवाड कुटुंबीय वाघोली पुणे येथून न्हावरे कडे येत होते. न्हावरे बाजूकडून तळेगाव कडे जाणाऱ्या कंटेनर नं एन. एल. 05 जी 2396 च्या अज्ञात चालकाने निष्काळजीपणाने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोरून येणाऱ्या स्वीफ्टला जोरदार धडक दिली. अपघाताची काही माहिती न देता चालक तेथून पळून गेला. कंटेनर अज्ञात चालकाविरुध्द शिरूर पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.