इंदापूर बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॉली पलटी होऊन १२ जखमी, ७ लहान मुलांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:18 IST2021-12-08T16:17:47+5:302021-12-08T16:18:19+5:30
जखमेतील सर्वजण ऊसतोड मजूर असून ते बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत

इंदापूर बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॉली पलटी होऊन १२ जखमी, ७ लहान मुलांचा समावेश
बाभुळगाव : इंदापूर शहरातील बाह्य वळण महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक दाबल्याने मागची ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण बारा जण जखमी झाल्याची औपचारिक माहिती मिळाली आहे .
ही घटना बुधवार दिनांक 8 डिसेंबरला सकाळी अकराच्या सुमारास घडली असून जखमींना उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सात लहान मुलांचा समावेश असून त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी बारामती महिला रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. जखमेतील सर्वजण ऊसतोड मजूर असून ते बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
ट्रॅक्टर चालक उसाचा मोकळा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्या सह घेऊन पुणे बाजूने सोलापूर बाजूला जात होता. इंदापूर बाह्यवळण महामार्गावरील शिंदे चौक येथे ढगे फार्म हाउस जवळ समोरून कुत्रा आडवा आल्याने ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या मागे जोडलेली ट्रॉली पलटी होऊन बारा जणांना दुखापत झाली आहे.
मयुरी विठ्ठल मोरे (वय 6), लखन गायकवाड (वय 8), विवेक लखन गायकवाड (वय 6), कविता गंगाराम पवार (वय 6), सीमा संजय पवार (वय 18), रेश्मा सुनील सपकाळ (वय 30), अनिकेत पांडुरंग गायकवाड (वय 10), आरती लखन गायकवाड (वय 12), जोशना विठ्ठल माटे (वय 26), जनाबाई लखन गायकवाड (वय 26), आशा गंगाराम पवार (वय 60), हे सर्व जखमी झाले असून बीड जिल्ह्यात राहणारे आहेत. तर ट्रॅक्टर चालक परांडा येथील असल्याचे समजते आहे.