घराच्या वाटणीवरून भावंडात वाद..! मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत लहान भावाकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:52 PM2024-12-02T13:52:13+5:302024-12-02T13:52:55+5:30
लहान भावाने मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला व त्याच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले.
पिंपरी : वडिलोपार्जित घराच्या वाटणी पत्रावरून झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास साईनाथनगर, निगडी येथे घडली.
अरविंद मोहन खोलीया (५५, रा.साईनाथनगर, निगडी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वल्लभ मोहन खोलीया (५३, रा.साईनाथनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद आणि त्यांचा भाऊ वल्लभ यांच्यामध्ये वडिलोपार्जित घराच्या वाटणी पत्रावरून वाद सुरू आहे. त्यावरून त्यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास फिर्यादी अरविंद आणि त्यांची पत्नी मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते.
दर्शन घेऊन घराच्या गेटजवळ आल्यानंतर अरविंद यांचा लहान भाऊ वल्लभ याने अरविंद आणि त्यांच्या पत्नीला अडविले. तुम्हाला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणत अरविंद यांच्या डोळ्यात मिरची टाकून अरविंद व त्यांच्या पत्नी यांना लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले.