पुण्यातील भयानक घटना! अनैतिक संबंधात अडथळा; पोटच्या लेकाचा डोक्यात दगड घालून खून, आईचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 13:34 IST2024-10-11T13:34:38+5:302024-10-11T13:34:51+5:30
आई आणि तिच्या प्रियकराचे मुलाशी कडाक्याचे भांडण झाले होते, यावेळी दोघांनी मारहाण करत मुलाच्या डोक्यात दगड घातला

पुण्यातील भयानक घटना! अनैतिक संबंधात अडथळा; पोटच्या लेकाचा डोक्यात दगड घालून खून, आईचे कृत्य
किरण शिंदे
पुणे: पुण्यातील लोणीकंद परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या पोराला आईनेच ठार मारलं. डोक्यात दगड घालून आई आणि तिच्या प्रियकरांनी तीस वर्षीय मुलाचा खून केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या तर प्रियकर पसार झाला आहे.
अनिल लालसिंग ठाकूर (वय ३०) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिलची आई सुमित्रा लालसिंग ठाकूर (वय ५५, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) हिला अटक केली. तर, सुमित्राचा प्रियकर प्रफुल्ल पुंडलिक ताथोड (वय ३४, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) हा फरार झाला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलचा भाऊ सुनील ठाकूर (वय ३२) याने याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित्रा आणि तिची मुले उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. पेरणे फाटा परिसरातील वाघमारे वस्तीत ते राहत होते. याच परिसरात राहणारा आरोपी प्रफुल्ल सोबत सुमित्राचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाची कुणकुण अनिलला लागली होती. त्यामुळे त्यांच्यात वादावादी होत होती. तर, कडाक्याचे भांडणही झाले होते.
दरम्यान बुधवारी मध्यरात्री ही त्यांच्यात भांडण झाले. आणि याच भांडणातून सुमित्रा आणि प्रफुल यांनी अनिल याला शिवीगाळ करत मारहाण केली. तर त्याच्या डोक्यात दगडही घातला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी धाव घेतली. आई सुमित्रा हिला अटक केली तर प्रियकर प्रफुल्ल हा पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.