Accident: इंदापूरात सणसर येथे जीपचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:04 PM2022-04-12T21:04:13+5:302022-04-12T21:04:22+5:30
इंदापूरच्या सणसर येथे महिंद्रा थार जीप सरबत पिण्यासाठी थांबलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर गेल्याने गंभीर अपघात झाला
सणसर : इंदापूरच्या सणसर येथे महिंद्रा थार जीप सरबत पिण्यासाठी थांबलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर गेल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात चालकासह चार जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
याविषयीची सविस्तर माहिती अशी की, बारामती इंदापूर मार्गावर सणसर येथे पाचच्या दरम्यान महिंद्रा कंपनीची थार गाडी इंदापूरच्या दिशेने चालली होती. मात्र सणसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर ही जीप अचानक पणे रस्त्याच्या विरुद्ध बाजूला वळाली. ही जीपने समोरच असलेल्या सरबताच्या दुकानात बसलेल्या तीन जणांना या गाडीने उडविले. यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले.
जखमींमध्ये सणसर येथील किरण कुलकर्णी व त्यांच्या पत्नी कल्याणी कुलकर्णी, अमृत निंबाळकर यांचा समावेश आहे. चौथ्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे .तर गाडीचा चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात इतका गंभीर होता की काही कळायच्या आत जीपने तिघांना उडवले. दोन दुचाकींना उडवत प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकली.त्यात संरक्षक भिंत पडली. गावातील तरुणांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी सणसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
मात्र ,सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व अन्य कर्मचारी उपस्थित नसल्याने जखमींना तात्काळ मदत मिळाली नाही. परंतु तेथे डॉक्टरांसह कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांना बारामतीला हलविण्यात आले. दवाखान्यातील या बेशिस्त कर्मचाऱ्यांमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याला जबाबदार कोण असे म्हणत सणसर चे माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना मोबाईलवर संपर्क साधुन घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान,रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोेणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.