अंथुर्णे गावात दहशत, ३० ते ३२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल; आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गावातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:55 AM2023-07-31T10:55:54+5:302023-07-31T10:57:14+5:30
याप्ररकरणी ३० ते ३२ जणांविरूद्ध वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
इंदापूर : गायरानातील जागेच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर दहशत माजवण्यासाठी हातात काठ्या घेऊन गावातून फेरी मारत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार आ. दत्तात्रय भरणे यांच्या अंथुर्णे गावात शनिवारी (दि. २९) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. याप्ररकरणी ३० ते ३२ जणांविरूद्ध वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी कुलदीप आप्पा मोरे (वय ३८, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश मारूती शिंदे, दीपक भोसले, अनिकेत धुमाळ, हेमंत दगडे, अल्ताफ शेख, अक्षय शिंदे, सुमित शिंदे यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलदीप मोरे, दीपक भारत साबळे, राहुल गोपाळ सोनवणे, भीमराव मधुकर साबळे, रोशन सूर्यभान मोरे यांनी भरणेवाडी ग्रामपंचायत पाठीमागील गायरान जमिनीत राहण्यासाठी जागा धरली आहे. काल दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण त्या ठिकाणी पत्र्याची शेड मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी गणेश मारुती शिंदे हा त्या ठिकाणी आला. कोणाला विचारून तुम्ही येथे जागा धरला, अशी विचारणा करत या ठिकाणी तुम्ही शेड मारायचे नाही, असे धमकावत, शिविगाळ करून तुम्ही गावात कसे राहता, तेच बघतो. माझ्या खूप मोठ्या गुंडांशी ओळखी आहेत. तुमच्याकडे संध्याकाळी बघून घेतो म्हणत, जीवे मारण्याची धमकी देऊन तो निघून गेला.
त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिर्यादी व दीपक साबळे, राहुल सोनवणे, भीमराव साबळे, रोशन मोरे, प्रतीक दीपक साबळे हे अंथुर्णे येथील बौद्ध समाज मंदिरसमोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी टाकलेल्या सिमेंटच्या पाइपवर बसलेला असताना अचानक गणेश शिंदे इतर आरोपी हातात काठ्या घेऊन, अंथुर्णे बाजुकडून जंक्शन बाजुकडे आले. फिर्यादी व त्याचे सहकारी बसलेल्या ठिकाणापासून त्यांना शिविगाळ करत हा जमाव अंथुर्णे स्मशानभूमीपासून परत माघारी आम्ही बसलेल्या बौध्द समाज मंदिरसमोर आला. त्यांच्या दहशतीला घाबरून फिर्यादी व त्याचे सहकारी घरी निघून गेले, असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.