पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 06:35 PM2019-03-28T18:35:41+5:302019-03-28T19:35:43+5:30
चाकण एमआयडीसीतील वासुली फाटा ( ता. खेड ) येथून शरियत मंडल ( पूर्ण नाव नाही ) या पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय दहशतवादी तरुणास अटक करण्यात आली आहे.
चाकण : पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारास पुण्यातील चाकण जवळील खालूंब्रे ( ता.खेड ) येथून बिहार एटीएसने अटक केली आहे. शरियत अन्वरहूलहक मंडल ( रा. बाजीपूर, ता. गंजा, जि. नादिया, प. बंगाल ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शरियत हा बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. बिहारमधील पाटणा जंक्शन येथे एटीएसने खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघा बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये शरियतचे नाव पुढे आले. त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने चाकण पट्ट्यात छापा मारून शरियत याला अटक केली. त्याच्यावर बिहार मध्ये दिनांक २४ मार्च २०१९ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक १/२०१९, अंडर सेक्शन १८, ३८ युएपीए, भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह फॉरेन ऍक्ट १४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांकडे सीआरपीएफ जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट आढळून आली होती. तसेच इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली. यामुळे देशातील तपास यंत्रणा देखील चक्रावून गेल्या आहेत.
खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांच्या चौकशीत शरियत याचे नाव पुढे आले. हे तिघे जण इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश ( आय एस बी डी )आणि आयसिस सह जमात-उल-मुजाहिद्दीन ( जेएमबी ) या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत.
दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि गोव्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा कट आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळवून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारतानं पाकमध्ये घुसून एअर स्ट्राइक करत २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.