पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवादात वाढ - तलमीज अहमद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 07:21 PM2018-01-18T19:21:41+5:302018-01-18T19:22:14+5:30
पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले.
पुणे - पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले.
सविताबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सेक्युरिटी अँड डिफेन्स अनलिसिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय संबंध या व्याख्यानमालेत 'पोलिटिकल इस्लाम अँड ग्लोबल जिहाद; चैलेंजस फॉर ग्लोबल सेक्यरिटी' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमद बोलत होते. या प्रसंगी निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. एम. हारीस, माजी राजदूत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक श्रीनिवास सोहनी, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्तीत होते.
अहमद म्हणाले, धर्म या संकल्पनेवर विचारवंतांचा पगडा आहे. याबरोबरच धर्माला प्रसिद्धी देणारे आणि गुढवादी संकल्पनेत वावरणारे धर्माचा आधार घेतात. सर्वसामान्यांचा धर्मावर असलेल्या विश्वासाचा फायदा आज राजकीय लोक त्याच्या स्वार्थासाठी वापरतात. त्याचा श्रद्धेचा वापर करून त्यांना राजकीय प्रवाहात ही मंडळी खेचताना आज जगात दिसते.
श्रीनिवास सोहनी म्हणाले, इस्लाम मध्ये असलेल्या काही गोष्टीचा काही कट्टर लोक गैरफायदा घेत आहेत. लोकांसमोर त्याचे चुकीचे सादरीकरण करून त्यांना दहशतवादी बनविलेले जात आहे. त्यांना आणखी कट्टर कसे बनवता येईल यावर ते भर देत आहेत. हे धोक्याची बाब आहे.
पी. एम हारीस म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लोकांवर धर्माचा पगडा वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेत आज मुस्लिम महिलांमध्ये बुरखा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. पुर्वी ही परिस्तिथी नव्हती. हा कट्टरता वाद का वाढत आहे याचा अभ्यास आज होणे गरजेचे आहे. हे करत असताना त्यांना सर्वसमावेशक विकासात आणणे गरजेचे आहे. याचबरोबर याचे जागतिक, आर्थिक, सामाजिक तसेच लष्करी दृष्ट्या होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.