हडपसरमध्ये दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध
By विवेक भुसे | Published: December 31, 2023 04:08 PM2023-12-31T16:08:23+5:302023-12-31T16:08:37+5:30
आरोपीने त्याच्या साथीदारांसह चाकू, कोयता यासारख्या घातक हत्यारासह दुखापतीसह जबरी चोरी, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत
पुणे : हडपसर परिसरात हदशत माजविणारा रांजणगाव येथील गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अजय युसुफ मौजण (वय १९, रा. पांचुदकर वस्ती, रांजणगाव) असे या गुंडाचे नाव आहे. अजय मौजण हा सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांसह रांजणगाव एमआयडीसी व हडपसर पोलीस ठाणे परिसरात चाकू, कोयता यासारख्या घातक हत्यारासह दुखापतीसह जबरी चोरी, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, पी सी बीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी त्याची पडताळणी करुन मौजण याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. चालू वर्षामध्ये दहशत निर्माण करणार्या व सक्रीय गुन्हेगारांवर एम पी डीए कायद्यान्वये स्थानबद्धतेच्या ७७ कारवाया केल्या आहेत.