पुणे ISIS मॉडयुल प्रकरणातील पसार दहशतवाद्याला NIA कडून अटक, पुण्यातून गेला होता पळून
By विवेक भुसे | Published: November 2, 2023 09:21 PM2023-11-02T21:21:55+5:302023-11-02T21:26:46+5:30
मोहम्मद शाहनवाज आलम (रा. हजारीबाग, झारखंड) असे त्याचे नाव आहे...
पुणे : देशभरात दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्याच्या पुणेइसिस मॉडयुल प्रकरण उघडकीस येत असताना पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने अटक केली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील ही आठवी अटक आहे.
मोहम्मद शाहनवाज आलम (रा. हजारीबाग, झारखंड) असे त्याचे नाव आहे. हे पुणे इसिस मॉड्युल प्रकरण उघडकीस येत असताना तो पुण्यातून पळून गेला होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दिल्ली पोलिसांचा विशेष सेल शोध घेत होता. पुणे पोलिसांशी ते सातत्याने संपर्कात होते. गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने त्याला पकडले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून एनआयएने पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात अटक केली. मोहम्मद शाहनवाज आलम याने हत्यारे, विस्फोटक, खरेदी केले होते. दिल्लीत एक खोलीही भाड्याने घेतली होती.
पुणे शहरातील कोथरुड पोलिस गस्त घालत असताना १९ जुलै २०२३ रोजी दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असताना मोहम्मद शाहनवाज आलम, इम्रान खान आणि युनूस साकी या तिघांना पकडण्यात आले होते. त्यांच्या कोंढव्यातील घरी नेत असताना मोहम्मद आलम हा पळून गेला होता. त्यानंतर या तिघांच्या घरझडतीत मिळालेल्या साहित्यावरुन ते दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या तपासणीत त्यांना एनआयए ने त्यांना जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात फरारी घोषित केले असून त्यांच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस लावले असल्याचे समोर आले. तेव्हापासून मोहम्मद आलम याचा शोध घेण्यात येत होता.
याप्रकरणी अगोदर अटक केलेल्या आरोपींशी शाहनवाज आलम याचा थेट संबंध असल्याचे तपासात समोर आले. शाहनवाज याने गुप्तहेर म्हणून वापरण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणे शोधण्यात तसेच गोळीबाराचे प्रशिक्षण तसेच स्फोटक उपकरणाचा सराव करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यास सक्रिय भूमिका बजावली होती.
शाहनवाज याने २०१६ मध्ये नागपूर येथील एनआयटी मायनिंग मध्ये बी टेक केले आहे. एसएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तो नोव्हेबर २०१६ मध्ये दिल्लीत आला होता. तेथे त्याचा इतरांशी संपर्क आल्यानंतर तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.