पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By विवेक भुसे | Published: July 19, 2023 03:54 PM2023-07-19T15:54:33+5:302023-07-19T15:54:56+5:30

राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत

Terrorists arrested in Pune remanded in police custody till July 25 | पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext

पुणे : राजस्थानमध्ये बॉम्ब बनविण्याचे साहित्य जमा करुन बॉम्बस्फोटाची साखळी तयार करण्याच्या प्रयत्नात असलेले आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पुणेपोलिसांनी आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार न्यायालयात हजर केले. या संवेदनशील प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने त्यांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले राजस्थानमधील दोन अतिरेकी गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात लपवून बसले असल्याचे उघडकीस आले आहे. एका वाहन चोरीच्या प्रकरणात नाकाबंदीच्या दरम्यान दोघांना ताब्यात घेतले असताना ते फरार अतिरेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
इम्रान खान आणि मो़ युनूस साकी (रा. रतलाम, मध्यप्रदेश)अशी या दोन संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी माहिती दिली. कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन हे १८ जुलै रोजी गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे पावणे तीन वाजता त्यांनी ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यानंतर त्यांना घरझडतीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिस पथकाने त्यांच्यापैकी दोघांना पकडले. कोंढव्यातील त्यांच्या घरझडतीत पोलिसांनी एक जिवंत काडतुस, ४ मोबाईल आणि लॅपटॉप सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. सुरुवातीला ते वाहन चोर असल्याचा संशय होता.

त्यांच्याकडे सायंकाळी चौकशी केली जात असताना ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांच्याकडील लॅपटॉपची तपासणी केल्यावर ते देत असलेली माहिती आणि त्यातील कागदपत्रे यात विसंगती आढळून आली. त्यामुळे हे दोघेही देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आल्याने शहर पोलिसांनी ही बाब दहशतवाद विरोधी पथकाला कळविली. एटीएसचे पथकही कोथरुड पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर या दोघांना शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आणण्यात आले. स्वत: पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा ते मुळचे राजस्थानमधील असून चितोढगड या ठिकाणी एनआयएने कारवाई केली होती.  त्यात काही स्फोटके सापडली होती. त्या गुन्ह्यात हे तिघे संशयित होते. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींनी त्यांना फरार घोषित केले आहे. त्यांना पकडणार्‍यास प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असल्याची माहिती समोर आली. राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

Web Title: Terrorists arrested in Pune remanded in police custody till July 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.