सांस्कृतिक पुण्यावर दहशतवाद्यांचा डोळा, पुणे कनेक्शन पुन्हा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:22 AM2018-03-19T00:22:59+5:302018-03-19T00:22:59+5:30
शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत जेवढ्या वेगाने झाला, त्याच वेगाने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देश-परदेशातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि रोजगारासाठीही येतात.
पुणे : शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत जेवढ्या वेगाने झाला, त्याच वेगाने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात देश-परदेशातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि रोजगारासाठीही येतात. काही वर्षांत पुणे शहर हे दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशविघातक शक्तीसाठी एक केंद्र बनत गेले आहे़
याअगोदर पाकिस्तानच्या आयएसआय, इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी संपर्कात असलेल्यांचे जाळे शहरात असल्याचे विविध कारवायांतून स्पष्ट झाले होते़ एटीएसने अल् कायदाशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले़ बांगलादेश सरकारने बंदी घातलेल्या एबीटी या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे़
>पुण्यात आश्रय
पुणे व देशभरात अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत कोंढव्यातील मोहसीन चौधरी याचा एटीएस अद्याप तपास करीत आहे. या दहशतवाद्यांबरोबरच नक्षलवादी कारवायांना पुणे शहरात आश्रय मिळत असल्याचेही समोर आले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ़ सत्यपाल सिंह यांनी शहरात नक्षलवाद्यांचे स्लिपर सेल कार्यरत असल्याकडे लक्ष वेधले होते़ शहरालगतच्या गावांमधून नक्षलवादी चळवळीशी संबंधित असलेल्यांना एटीएसने यापूर्वी पकडले होते़ पुण्यातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा अबाधित ठेवायची असल्यास दहशतवाद्यांना पाठबळ देणाºयांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान तपास यंत्रणेपुढे आहे़, हेच या बांगलादेशींच्या घुसखोरीवरून
स्पष्ट होत आहे.
>स्फोटाने शहर हादरले
त्यानंतर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाने सर्वांना हादरवून सोडले़ १३ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात १७ जणांना जीव गमवावा लागला़ ५३ हून अधिक जण गंभीर जखमी झाले़ या बॉम्बस्फोटाचे कनेक्शन अगदी मराठवाड्यापर्यंत पोहोचल्याचे उघड झाले़ या बॉम्बस्फोटात रियाज भटकळ, यासिन भटकळ यांचा हात असल्याचे उघड झाले़ मोहसिन बेग याला या प्रकरणात शिक्षा झाली़ त्यानंतर जंगली महाराज रोडवर एकाच वेळी काही अंतरावर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले़ त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट करुन पुन्हा एकदा पुणे हे दहशतवाद्यांचे टार्गेट असल्याचे दिसून आले़ दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन वारंवार उघड झाले आहे़
>शांत शहर म्हणून होता पुण्याचा लौकिक
बाबरी मशीद पडल्यानंतर अनेक ठिकाणी दंगली झाल्या;पण पुणे शांत राहिले़ तेव्हापासून शांत शहर म्हणून पुण्याचा लौकिक आहे. मात्र, त्याला पहिला तडाखा गेला तो २००८ मध्ये़ पुणे शहर व परिसरात अनेक परप्रांतीय रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत़ अगदी बांगलादेशीयांची संख्या लक्षणीय आहे़ त्यातूनच मग दहशतवादी कारवायांसाठी आवश्यक असलेली सुपीक जमीन येथे तयार झाली़ त्यातूनच सिमी, इंडियन मुजाहिद्दीन या संघटनांची पाळेमुळे पद्धतशीरपणे रोवली़ सुमारे दहा वर्षांपूर्वी देशभरातील अनेक शहरांत बॉम्बस्फोट झाले़ त्याची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीन संघटनेने ई-मेल पाठवून घेतली होती़ मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राकेश मारिया यांनी २००८ मध्ये पुण्यातील कोंढवा भागातील अशोक म्युझ या सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकून काही तरुणांना पकडले होते़ या फ्लॅटवर मीडिया सेल स्थापन करुन त्याद्वारे देशभरातील तरुणांची माथी भडकविण्याचे काम केले जात होते़ देशभरात होत असलेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड रियाझ भटकळ असल्याचे व त्याचा वावर पुण्यात असल्याचे त्या वेळी उघड झाले होते़
>बांगलादेशींचे आव्हान
यापूर्वी बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रकरणात असंख्य बांगलादेशी देशभरात आढळून आले आहेत़ त्यांच्यामार्फत बनावट नोटांचा देशात सुळसुळाट वाढला होता़ शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीतही त्यांचा काही प्रमाणात हात दिसून आला़ पण, पुण्यात दहशतवादी कारवायांमध्ये बांगलादेशी गुंतल्याचे प्रथमच पुढे आले
आहे़ त्यामुळे आता हे आव्हानही वाढले आहे़