टवाळखोरांवर ‘निर्भया’चा वचक !

By admin | Published: October 2, 2016 05:36 AM2016-10-02T05:36:57+5:302016-10-02T05:36:57+5:30

भररस्त्यात आणि निर्जन ठिकाणी छेडछाड करणाऱ्या हजाराहून अधिक टवाळखोर व रोडरोमिओंना निर्भया पथकाने चांगलेच वठणीवर आणले आहे. महिनाभराच्या कालावधीत या

Terrorists' fearless! | टवाळखोरांवर ‘निर्भया’चा वचक !

टवाळखोरांवर ‘निर्भया’चा वचक !

Next

- निनाद देशमुख , पुणे

भररस्त्यात आणि निर्जन ठिकाणी छेडछाड करणाऱ्या हजाराहून अधिक टवाळखोर व रोडरोमिओंना निर्भया पथकाने चांगलेच वठणीवर आणले आहे. महिनाभराच्या कालावधीत या पथकाने टवाळखोरांविरोधात जिल्ह्यातील ६७५ संवेदनशील ठिकाणी कारवाई करून जवळपास १,३२० जणांवर कारवाई केली. ६३२ जणांवर कारवाई करून त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थिनींना खऱ्या अर्थाने भयमुक्त होत असल्याचा दिलासा मिळाला आहे.

टवाळखोरांमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थिनींना आणि महिलांना भयमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाने रोडरोमिओंविरोधात पुणे जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये शाळा-महाविद्यालये तसेच निर्जन रस्त्यावर टवाळखोरांनी विद्यार्थिनींची तसेच महिलांची छेड काढण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. टवाळखोरांमुळे अनेक विद्यार्थिनी शाळेत जाणे टाळत होत्या. त्यांच्याविरोधात तक्रारी करूनही या घटना वाढतच होत्या.
कोपर्डी प्रकरणानंतर ‘जिल्ह्यातील तरुणी असुरक्षित’ या मथळ्याखाली लोकमतने जिल्ह्यातील वास्तव पुढे आणले. यानंतर पोलिसांनी पावले उचलून या टवाळखोरांवरील कारवाई अधिक तीव्र केली. विशेष निर्भया पथकाने शाळा-महाविद्यालयांत मुलामुलींचे प्रबोधन सुरू केले. बारामती, दोंड, हवेली, भोर, लोणावळा, खेड, जुन्नर, देहूरोड या विभागांतील ६७५ संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवली. सीसी टीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवून निर्भया पथकाने महिनाभरात हजाराच्या वर रोडरोमिओंना वठणीवर आणले.

आठ विभागांत निर्भया पथक कार्यरत
बारामती, दौंड, हवेली, भोर, लोणावळा, खेड, जुन्नर, देहूरोड या आठ विभागांत निर्भया पथक कार्यरत आहेत. या पथकाची जबाबदारी १५ अधिकाऱ्यांवर दिली आहे. त्यांच्या मदतीला जवळपास ४ कर्मचारी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांनी महिलांना भयमुक्त बनविण्याची जबाबदारी उचलली आहे.

ग्रामपंचायत, नगर परिषदेमार्फत सीसी टीव्ही कॅमेरे
निर्जनस्थळी ग्रामपंचात आणि नगर परिषद प्रशासनामार्फत सीसी टीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. तसेच, रात्रीच्या वेळी कुणाला त्रास होऊ नये म्हणून पथदिवे बसविण्यात येत आहेत. याचा फायदा कारवाई करताना पोलिसांना होत आहे.
दोन हजार तरुणांचे समुपदेशन
कारवाईत सापडलेल्या जवळपास दोन हजार अरोपी तसेच त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन पोलिसांनी केले आहे. संबंधित आरोपी आणि त्याच्या नातेवाइकांना बोलावून त्या व्यक्तीत बदल करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलींनी न घाबरता पुढे यावे
छेडछाड होत असल्यास विद्यार्थिनींनी न घाबरता आणि कुठलीही गोष्ट मनात न ठेवता आपल्या घरच्यांना त्याची माहिती द्यावी. ते शक्य नससल्यास आपल्या प्राध्यापक, शिक्षक किंवा जवळच्या व्यक्तीला माहिती द्यावी. यामुळे या घटनांना वेळीच आळा घालता येणे शक्य होईल. बऱ्याचदा मुली या घटना सांगत नसल्याने त्यात वाढ होऊन त्यांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे मुलींनी व्यक्त व्हावे.
- साधना पाटील, सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Terrorists' fearless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.