मोबाईल अलर्ट.... घाबरू नका; सर्वांना 'या' कारणासाठी आले पॉप अप मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:19 PM2023-07-20T12:19:42+5:302023-07-20T12:25:22+5:30
भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्ती काळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे या विभागाने यापूर्वी म्हटले होते...
पुणे : वेळ सकाळी साडेदहाची... मोबाईल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागला. मोबाईलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला. नेमका हा आवाज कशाचा काहीच समजेना.... आपला मोबाईल हॅक झाला किंवा त्यातील डेटा चोरीला गेल्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त झाले. मात्र यात चिंता करण्यासारखे काही नसल्याचे समोर येत आहे. केंद्र अथवा राज्य सरकारने याबद्दल घोषणा केली नसली, तरीही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा स्वरूपाची सेवा देऊ शकण्याच्या क्षमतेचा आहे. विशिष्ट भौगोलिक परिसरात अथवा देशभरात एकाच वेळी सर्व मोबाईल नंबरवर आपत्कालीन सूचना पाठविण्याची या विभागाची क्षमता आहे.
भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्ती काळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू असल्याचे या विभागाने यापूर्वी म्हटले होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पोर्टल https://sachet.ndma.gov.in/ या विषयावर अधिक तपशिलाने माहिती देणारे आहे. राज्यात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. काही ठिकाणी पूरस्थितीचाही धोका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक मोबाईल युजरला आज सकाळी १०. २० ते १०. ३० च्या दरम्यान हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आपत्कालीन अलर्ट आला.
भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्तीच्या वेळी असा अलर्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणार आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. भविष्यात आपल्या भागात काही आपत्कालीन सूचना द्यायची असेल तर आपल्या मोबाईलवर याप्रकारे अलर्ट दिला जाईल. आपल्याला असा अलर्ट आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचाव्यात आणि त्यांचे पालन करावे, असे आवाहनही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या पोर्टलवर यापूर्वी केले आहे. मोबाईलमध्ये असे वायरलेस अलर्ट बंद करण्याची सुविधादेखील दिलेली आहे. परंतु आपण त्याचा वापर करू नये. कारण तसे केल्यास तुम्हाला आपत्तीच्या पूर्व सूचना येणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.