नवभारत साक्षरता अभियानांतर्गत चाचणीचा निकाल जाहीर; राज्यातील सव्वाचार लाख नवसाक्षर उत्तीर्ण
By प्रशांत बिडवे | Published: May 6, 2024 07:29 PM2024-05-06T19:29:07+5:302024-05-06T19:29:33+5:30
राज्यात दि. १७ मार्च राेजी ३६ हजार परीक्षा केंद्रावर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते....
पुणे : उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातून ४ लाख ५९ हजार ५३३ असाक्षर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी ९२.६८ टक्के म्हणजेच ४ लाख २५ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यांसह ३३ हजार ६२७ जणांना सुधारणा आवश्यक असा शेरा देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण संचालनालय (याेजना) संचालक डाॅ. महेश पालकर यांनी दिली.
राज्यात दि. १७ मार्च राेजी ३६ हजार परीक्षा केंद्रावर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते. उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांमध्ये १ लाख ३० हजार २२९ पुरुष आणि २ लाख ९५ हजार ६७१ महिला आणि ६ तृतीयपंथीय व्यक्तींचा समावेश आहे. जनरल प्रवर्गातील ८५ हजार ८२४, एससी ५९ हजार ४७९, एसटी १ लाख २७ हजार ५६४, ओबीसी १ लाख ३७ हजार ६६८ आणि अल्पसंख्याक १५ हजार ३७१ नवसाक्षरांचा समावेश आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या www.nios.ac.in आणि https://results.nios.ac.in संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
वयाेगट / उत्तीर्ण नवसाक्षरांची संख्या
१ ते ३५ / ७७ हजार ६३४
३६ ते ६५ / २ लाख ५१ हजार ७५४
६६ वर्षांपेक्षा / ९६ हजार ५१८
राज्यात तीन लाख महिला नवसाक्षर
उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षर नागरिकांत महिलांची संख्या लक्षणीय आहे. तीन लाख असाक्षर महिला नवसाक्षर झाल्या आहेत. तसेच अनुसूचित जमाती मधील १ लाख २७ हजार आणि ओबीसी प्रवर्गातील १ लाख ३७ हजार ६६८ नागरिक उत्तीर्ण झाले आहेत.