सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्याची चाचपणी : खासदार कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:19+5:302021-04-22T04:11:19+5:30
गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बेड, रेमडिसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची अस्वस्थता लक्षात ...
गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बेड, रेमडिसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची अस्वस्थता लक्षात घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बोलावलेली तालुक्याची कोविड आढावा झूम बैठक पार पडली. यावेळी विविध अडचणींवर चर्चेदरम्यान सूचना दिल्या. खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या झूम बैठकीला तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काकणे उपस्थित होते.
या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता तालुक्यातील नागरिकांना तत्काळ कळावी यासाठी तयार केलेल्या डॅशबोर्ड व हेल्पलाईनची स्वतः चाचणी घेतली. चाचणी दरम्यान मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रशासनाचे कौतुकही केले. त्याचबरोबर रेमडिसिविर इंजेक्शनचा अवाजवी वापर टाळण्याबरोबर त्याची उपलब्धता करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
चाकण एमआयडीसीमुळे खेड तालुक्यात लोकसंख्या वाढली असून कामगार वर्ग विशेषतः मजुरांमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने 'सुपर स्प्रेडर' रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती खासदार डॉ. कोल्हे यांनी घेतली.
----
चौकट
ग्रामीण रुग्णालयात तंत्रज्ञाअभावी पडून असलेले व्हॅंटिलेटर खसागी रुग्णालयालाय
चांडोली ग्रामीण रुग्णालयात तंत्रज्ञांअभावी पडून असलेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना देण्यासंदर्भात जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी निर्देश दिले होते. त्या निर्देशाची तातडीने व्हावी व खासगी रुग्णालयात तरी व्हेंटीलेटर सुरु असावे अशा सचुना खा. कोल्हे यांनी दिल्या.
----------------------------------------------------------