वनाज ते गरवारे मेट्रोची चाचणी महिनाभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:40+5:302021-03-14T04:10:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वनाज ते गरवारे महाविद्यालय या ५ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची चाचणी येत्या महिनाभरात होईल. त्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वनाज ते गरवारे महाविद्यालय या ५ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची चाचणी येत्या महिनाभरात होईल. त्यासाठी मेट्रोच्या तीन डब्यांच्या दोन गाड्या वनाज डेपोत डेरेदाखल झाल्या आहेत. या मार्गावरच्या वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप व गरवारे महाविद्यालय या ५ स्थानकांच्या कामालाही त्यामुळे गती देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड मेट्रो मार्गांच्या तुलनेत बरेच मागे पडलेले वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गांचे काम आता महामेट्रोने जवळपास पूर्ण करत आणले आहे. विद्युत खांब, संगणकीय दिशादर्शक दिवे ही कामे आता अंतिम टप्यात असल्याने डब्यांची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे दोन गाड्यांचे प्रत्येकी ३ असे सहा डबे वनाज येथील डेपोत पोहोचले आहेत. नागपूर मेट्रोसाठीचे हे डबे आहेत. पुण्यात ते फक्त चाचणीसाठी वापरण्यात येतील. पुण्यातील दोन्ही मार्गांवरील मेट्रोचे डबे इटली येथील कारखान्यातून येणार आहेत.
चाचणीपूर्व तयारीला साधारण महिना लागेल. उन्नत मार्गावरील काही किरकोळ पण मेट्रो धावण्यासाठी महत्त्वाची कामे सध्या सुरू आहेत. ती त्वरित पूर्ण करण्याबाबत ठेकेदार कंपनीला कळवण्यात आले आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांपैकी गरवारे महाविद्यालय, आयडीयल कॉलनी, आनंदनगर या स्थानकांचे काम आता ६० टक्के पूर्ण झाले आहे. छत व अन्य कामेही तातडीने, जास्तीचे मजूर लावून करण्यात येत असल्याची माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.
पुण्यातील पहिला दुहेरी पूल
याच मार्गावर सोनल हॉल ते एसएनडीटी महाविद्यालय हा सुमारे ३५० मीटर लांबीचा पुण्यातील पहिला दुहेरी पूल तयार होतो आहे. मेट्रोच्या खांबाला जोडून असणारा हा पूल चारपदरी (साधारण १४ मीटर रूंद) असेल. त्याचे काम झाले आहे. पूल तयार झाला की वरून मेट्रो त्याखाली हा पूल व पुलाखाली रस्ता असे दृष्य नळस्टॉप चौकात दिसेल.