परीक्षापध्दतीलाच व्हॉटस अपचे आव्हान
By admin | Published: May 14, 2014 10:01 PM2014-05-14T22:01:29+5:302014-05-15T04:45:19+5:30
पुणे विद्यापीठ : पेपरफुटी झाली सोपी
पुणे विद्यापीठ : पेपरफुटी झाली सोपी
पुणे : व्हॉटस ॲपसारख्या सोशल मीडियाचे फायदे अनेक असले तरी यामुळे परीक्षापध्दतीलाच आव्हान निर्माण झाले आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका हातातल्या मोबाईलमध्ये सेकंदात मिळणे शक्य झाले आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका काही दिवसांपासून व्हॉटस् ॲप वरून फुटत असल्याचा दावा विद्यार्थ्यांतर्फे केला जात आहे. विद्यापीठाकडेही यासंदर्भातील तोंडी तक्रारी आल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना व्हॉटस् ॲपवर प्रश्नपत्रिका कशा मिळतात हे शोधून विद्यापीठाला त्यावरील उपाय योजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाला धोरणात्मक व कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.
पुणे विद्यापीठाची व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपरच्या आदल्या दिवशीच मिळाली होती. ही घटना नुकतीच समोर आली असली तरी एमबीएचे पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना १५ ते २० मिनिटे आगोदरच संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळत होत्या.अशा तक्रारी नाशिक व पुणे जिल्ातील काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे केल्या होत्या.परंतु, विद्यापीठ व महाविद्यालयाकडे याबाबतचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे कार्यवाही करणे विद्यापीठ प्रशासनाला अवघड जात आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे १५ मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळू शकतात. हे विद्यापीठ प्रशासनाकडूनही मान्य केले जात आहे.
परीक्षा विभागातर्फे संलग्न महाविद्यालयांना ऑनलाईन पध्दतीने प्रश्नपत्रिका पाठविल्या जात आहेत. त्या ओपन करण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील एक किंवा दोन व्यक्तींना पासवर्ड दिलेला असतो. त्याच व्यक्तींनी पासवर्डच्या माध्यमातून परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक किंवा पाऊण तास आगोदर प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढणे अपेक्षित आहे. याची अंमलबजावणी सर्वच महाविद्यालयांमध्ये काटेकोरपणे होत नाही. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी मोबाईलवरून प्रश्नपत्रिका मिळतात,असे विद्यापीठातील अधिकारी सांगत आहेत.
महाविद्यालयातूनच फुटते प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिका विद्यापीठातून फुटत नाही तर झेरॉक्स काढण्यासाठी एक ते आर्धातास आगोदर महाविद्यालयांना ऑनलाईन पध्दतीने पाठविली जाते. त्या काळात काही महाविद्यालयातून प्रश्नपत्रिकांचा फोटो काढून विद्यार्थ्यांना व्हॉटस् ॲपवरून पाठविल्या जातात. त्यामुळे विद्यापीठाला यातून अंग काढून घेता येणार नाही. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेणे, तसेच सर्व विद्यार्थी वर्गात बसल्यानंतर महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊन लोड करून घेण्यासाठी विद्यापीठाने पासवर्ड पाठवणे,या दृष्टीने विद्यापीठाने विचार केला तरच विद्यार्थ्यांना व्हॉटस ॲप वरून प्रश्नपत्रिका मिळणे बंद होईल, असे मत अधिकार्यांकडून व्यक्त केले जात आहे.
---