पुणे : कोरेगाव भीमा आयोगासमोर विभागीय आयुक्तांची साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:27 PM2022-06-07T13:27:24+5:302022-06-07T13:28:38+5:30
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारावेळी राव हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते...
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या पटेल आयोगासमोर सोमवारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांची साक्ष नोंदविण्यात आली. राव यांनी यापूर्वीच आयोगाकडे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसरात होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत माहिती दिली आहे.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारावेळी राव हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. आयोगाने राव यांच्या व्यतिरिक्त ग्रामीण पोलीस दलातील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संदीप पखाले, निवृत्त पोलीस उपअधीक्षक गणेश मोरे व शिक्रापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांना समन्स बजाविले आहेत. या आयोगात निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्य आहेत.
राव हे साक्ष नोंदविण्यासाठी सोमवारी आयोगासमोर हजर राहिले. आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी राव यांची सरतपासणी घेतली, तर ॲड. बी. जी. बनसोडे यांनी उलटतपासणी घेतली. वढू बुद्रुक आणि कोरेगाव भीमा येथील घटना; तसेच ऐतिहासिक स्तंभाच्या जागेचा ताबा याबाबत उलटतपासणी घेण्यात आली. राव यांची सोमवारी दिवसभर साक्ष नोंदविण्यात आली.
आयोगाचे कामकाज १० जूनपर्यंत पुण्यातून होणार आहे. या कालावधीत पखाले, मोरे आणि गलांडे यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणी यापूर्वीच पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.