Pune Crime: हातवारे, खाणाखुणा करत मतिमंद मुलीची साक्ष; बलात्कारातील आरोपीला १० वर्ष शिक्षा
By नम्रता फडणीस | Published: May 6, 2024 05:39 PM2024-05-06T17:39:16+5:302024-05-06T17:40:11+5:30
न्यायालयाने दहा वर्षांची कठोर शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली...
पुणे : मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून आरोपीने बलात्कार केल्याची दिलेली साक्ष न्यायालयात महत्वाची ठरली. आरोपीला भा.दं वि कलम ३७६ (२), जे आणि एल अंतर्गत दोषी ठरवून न्यायालयाने दहा वर्षांची कठोर शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी रागीट यांनी हा निकाल दिला.
प्रताप बबनराव भोसुरे (वय ५९ रा. धानोरे ता. शिरूर जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. पीडित मुलगी सकाळी ८ वाजता शेळ्या चारण्यासाठी रानात गेली होती. आरोपीने शेतातील पडीक जागेतील मंदिराजवळ पीडितेला गोळ्या खायला देतो म्हणून जवळ बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली असल्याचे पीडितेच्या आईने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर आरोपीला १८ मे २०१५ मध्ये अटक करण्यात आली.
आरोपी हा गेली ८ वर्षे ११ महिने आणि १६ दिवसांपासून कारागृहात आहे. सरकारी वकील लीना पाठक यांनी या प्रकरणी ९ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या असक्षम असल्याने तिला इन कॅमेरा काही प्रश्न विचारण्यात आले. पीडित मुलीने खाणाखुणा आणि हातवारे करून तिच्यावर आरोपीने केलेल्या जबरदस्तीची कहाणी सांगितली. न्यायालयात पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र बी खोपडे यांनी तपास केला. कोर्ट पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार एस.बी भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ज्ञानदेव सोनावणे तसेच कोर्ट पैरवी अंमलदार विद्याधर निचीत यांनी काम पाहिले.