TET Exam Scam: ड्रायव्हर पाठवत होता विद्यार्थ्यांची नावे, हॉल तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 10:47 AM2021-12-31T10:47:22+5:302021-12-31T11:00:32+5:30
परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले...
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली. घोलप याने २०२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स अपवर पाठवित होता. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्यांना ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
घोलप याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व्हॉट्स अप चॅटिंगबाबत पुरावा हस्तगत करायचा आहे, घोलप याने स्वतंत्ररित्या विद्यार्थ्यांची नावे त्याच्या साथीदाराला पाठविली आहेत, तर डोंगरे हा सुपे व सावरीकर या दोघांच्या संपर्कात होता. या प्रकरणात त्याला तीन लाख पंचवीस हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी ॲड. जाधव यांनी केली.
दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांच्या न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप यांचे तांत्रिक विश्लेषण करून डिजिटल पुरावा मिळवायचा आहे. आरोपींविरोधात आणखी पुरावे मिळवून त्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल करायचे असल्याचे ॲड. जाधव यांनी सांगितले.
बचाव पक्षातर्फे ॲड. मिलिंद पवार, ॲड. योगेश पवार, ॲड. विश्वास खराबे हे काम पाहत आहे. त्यांनी, तपासी अधिकाऱ्यांना तपासाच्यादृष्टीने आवश्यक सर्व गोष्टी देण्यात आल्या असून तपास पूर्ण झाला आहे. पोलीस कोठडीदरम्यान सुपे यांनी पोलिसांना सहकार्य केले असल्याचा युक्तिवाद ॲड. पवार यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत सुपे व सावरीकर यांंची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यामुळे, यापुढे सुपे व सावरीकर यांचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे.