TET Exam Scam: आरोपीच्या घरातून 4 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि हिरे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 03:04 PM2021-12-25T15:04:02+5:302021-12-25T15:05:51+5:30
अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे...
पुणे: टीईटी घोटाळ्यात (tet exam scam) दररोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठं घबाड जप्त केले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार (ashwin kumar) याच्या बेंगलोर येथील घरातून तब्बल 24 किलो चांदी दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहे.
अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे. दरम्यान या प्रकरणात सुरुवातीला जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रीतिश देशमुख (pritish deshmukh) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशी धक्कादायक माहिती समोर आली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आजी-माजी आयुक्तांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
नंतर याचे धागेदोरे थेट बंगलोर येथील अश्विन कुमारपर्यंत जाऊन पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी त्याच्या बंगलोर येथील निवासस्थानी पोहोचलं. या ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी हिरे, सोनं, चांदी असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.