TET Exam Scam| बनावट प्रमाणपत्रे देऊन केले पास; ६५० बोगस प्रमाणपत्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:51 AM2022-02-24T11:51:54+5:302022-02-24T11:52:40+5:30
बनावट प्रमाणपत्रे देऊन पास केल्याचा प्रकार समोर...
पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवे नवे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. राज्य परीक्षा परीषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे (tukaram supe) याने इतरांशी संगनमत करुन निकाल लागल्यानंतर अनेकांना बनावट प्रमाणपत्रे देऊन त्यांना पास केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना आतापर्यंत २०१९-२० ची ४०० बनावट प्रमाणपत्रे आढळून आली आहेत. तर २०१८ च्या परीक्षेमध्ये पास झाल्याचे दाखवून २५० बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
टीईटी परीक्षेमध्ये तुकाराम सुपे, डॉ. प्रीतीश देशमुख, आश्विनकुमार यांनी एजंटांना हाताशी धरुन हजारो अपात्र परीक्षार्थींकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांना पात्र करुन घेतले. मुळ निकालात त्यांची नावे घुसविली. यावरच हे आरोपी थांबले नाहीत, तर निकाल लावल्यानंतर तुकाराम सुपे याच्याकडे आलेल्या यादीतील परीक्षार्थींना पात्र ठरवून त्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्याचे आदेश दिले. तसेच अनेकांना त्यांनी बनावट प्रमाणपत्रांची फोटो कॉपी काढून पोस्टांनी पाठवून दिल्याचे निष्पन्न झाले आहेत.
सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात परीक्ष परीषदेकडे बाेगस प्रमाणपत्राबाबत ४५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच २०३ अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा मिळाला आहे. तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहे. जी ए सॉफ्टवेअर जप्त डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, टीईटी परीक्षेत आरोपींनी परीक्षेचा निकाल लावल्यानंतर अनेक अपात्र परीक्षार्थींना बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. शिक्षण विभागाने सर्वांकडून ही प्रमाणपत्रे मागविली आहेत. आतापर्यंतच्या तपासणीत २०१९ - २० मध्ये सुमारे ४०० आणि २०१८ मध्ये सुमारे २५० जणांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे. ही संख्या अजून वाढू शकते.
पेपटफुटीतील आरोपी देशभरातील परीक्षा गैरव्यवहाराशी संबंधित सायबर पोलिसांनी आरोग्य भरती, म्हाडा, शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये अटक केलेल्या अनेक आरोपी हे देशातील विविध परीक्षा गैरव्यवहाराशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. यातील एका आरोपीने भारतातील अशा ४० परीक्षा केंद्रातील ठिकाणी ऑनलाईन परीक्षेत छेडछाड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.