TET Exam: शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची होणार पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 03:18 PM2022-01-05T15:18:01+5:302022-01-05T15:20:08+5:30
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) प्रमाणपत्र सादर करून राज्यातील शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी ...
पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) प्रमाणपत्र सादर करून राज्यातील शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. राज्यातील सर्व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळवल्या आहेत का? किंवा बनावट प्रमाणपत्र देऊन शिक्षकांची फसवणूक झाली आहे का? हे समोर येऊ शकते.
विविध परीक्षांच्या पेपरफुटीबरोबरच टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आला. त्यात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या प्रमुखांचा मोठा हात असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे.
खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळेत १३ फेब्रुवारी २०१३ नंतर इयत्ता आठवी ते पाचवीपर्यंत टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती केलेल्या शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबतचे निर्देश राज्याचे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी मंगळवारी दिले आहेत. राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात लवकरात लवकर प्रमाणपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीटीईटी प्रमाणपत्रधारकांची प्रमाणपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र, टीईटी प्रमाणपत्रे तातडीने जमा करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील शाळांमधील शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे तपासणीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात सर्व प्रमाणपत्रे प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे.
- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य