TET Exam | टी.ई.टी. परीक्षा घोटाळ्यात संचालक डॉ. प्रितिष देशमुख यास जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 03:31 PM2022-05-14T15:31:20+5:302022-05-14T16:57:18+5:30
सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे साहेब यांनी हा निर्णय दिलेला आहे
पुणे : सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितिष दिलीपराव देशमुख यास पुणे सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निर्णय दिलेला आहे.
प्रकरणाची थोडक्यात अशी की, सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षक भरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचे संचालनाचे काम हे जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीस देण्यात आले होते. सदर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून अपात्र उमेदवारास पात्र म्हणून घोषित करून तसा निकाल जाहीर केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणाची उघड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सदर बाबत फिर्याद दिली होती. या प्रकरणात संचालक प्रितिष देशमुख यास दिनांक २२/१२/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती व आरोपी याने त्याचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांचे मार्फत न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती.
सदर प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास पूर्ण झालेला असून दोषारोप पत्र सुद्धा दाखल करण्यात आले आहे. तसेच मा. उच्च न्यायालयाने यापूर्वी घेतलेल्या दखली मध्ये प्रस्तुत प्रकरणात आरोपींची आपापसात भेट हे संगनमत होत नाही असे नमूद केले होते. तसेच, संचालक आरोपी हा सदर घोटाळा करते वेळी कंपनीत कार्यरत नव्हता व त्यास चुकीच्या पद्धतीने संचालक असे दाखविण्यात आले असल्याची बाब आरोपीतर्फे ॲड .विजय ठोंबरे यांनी मांडली. तसेच, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक प्रकरणातील दाखले देत Bail is rule and jail is exception असा युक्तिवाद आरोपीतर्फे मांडण्यात आला.
सदर प्रकरणात आरोपी व अभियोग पक्षाची बाजू लक्षात घेत मे. सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. ए. पत्रावळे यांनी संचालक प्रीतेश देशमुख याची ५० हजार रुपये रक्कम रुपयाचे जातमुचलक्यावर सुटका केलेली आहे. तसेच त्यावर देशाबाहेर न जाण्याची व पुराव्यात छेडछाड न करण्याची व इतर बंधने लादण्यात आलेली आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे, ॲड. आशुतोष शेळके यांनी काम पाहिले. तसेच, विष्णु होगे यांनी सहाय्य केले.