‘सिजेंटा’च्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांकडे पाठ
By admin | Published: July 9, 2016 03:48 AM2016-07-09T03:48:04+5:302016-07-09T03:48:04+5:30
सिजेंटा कंपनीचे अधिकारी मंचर येथे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकरी साडेआठ हजार रुपये भरपाई टोमॅटो उत्पादक
मंचर : सिजेंटा कंपनीचे अधिकारी मंचर येथे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकरी साडेआठ हजार रुपये भरपाई टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची भूमिका सिजेंटा कंपनीने घेतली आहे. शेतकऱ्यांना ते मान्य नाही. शेतकरी आता आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, म्हणून सिजेंटा कंपनीच्या बाणेर (पुणे) येथील कार्यालयात आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी तेथील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंचर येथे गुरुवारी बैठक घेऊन भरपाईसंदर्भात ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली व त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर व इतर शेतकरी गुरुवारी बैठकीसाठी बाजार समितीच्या आवारात जमले होते. मात्र कंपनीचे अधिकारी आलेच नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
शेतकरी मंचर पोलीस ठाण्यात गेले. तेथे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. गोडसे यांनी सिजेंटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला. त्यानंतर संबंधित अधिकारी बांगर यांच्याशी बोलले. सिजेंटा कंपनीचा धोरणात्मक निर्णय झाला आहे. एकरी साडेआठ हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. डिसेंबर, जानेवारी यादरम्यान लागवड झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनाही भरपाई देणार असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी कंपनीच्या निर्णयाला विरोध केला आहे.
शेतकऱ्यांना कंपनीचा निर्णय मान्य नाही. आंदोलन करण्याचा इशारा बांगर यांनी दिला आहे. (वार्ताहर)