शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने नव्या पैशाचीही वाढीव मदत केली नाही - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 06:06 PM2019-12-23T18:06:14+5:302019-12-23T18:39:44+5:30
'राज्याच्या तिजोरीत जास्त पैसे नाहीत, मात्र इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती आहे.'
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने बधितांना 25 हजार हेक्टरी देऊ अशी घोषणा केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट काळात केलेली मदत सोडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने नव्या पैशाचीही वाढीव मदत केली नाही, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अधिवेशनाची औपचारिकता परवा पार पडली. पहिल्यांदा पाच -पाच तास चर्चा चालली. एका मंत्र्याने तीन, दुसऱ्याने साडेतीन मिनिटे उत्तर दिली आणि 16000 कोटींच्या मागण्या मान्य झाल्या, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. याचबरोबर, राज्यात अवकाळी पावसामुळे 94 लाख हेक्टर जमीन बाधित झाली. शेतकरी कर्ज भरू शकेल, अशा स्थितीत नाही. सांगली, कोल्हापूरला चालू वर्षाचे कर्ज रद्द केले. मात्र त्यांना वगळल्याने कर्जमाफी फसवी, असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देशात मोठ्या राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त चांगली स्थिती महाराष्ट्राची आहे. राज्याच्या तिजोरीत जास्त पैसे नाहीत, मात्र इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती आहे. सकल उत्पन्न 15.8 टक्के आहे. ऋणभार कमी आहे असून महसूल तूट मर्यादेत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कॅगचा आरोप हास्यास्पद असल्याचेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ते म्हणाले, 'ऑडिटमध्ये दिलेले पैसे हे वापरल्यावर पत्र द्यावे लागते. जर ते आले नाही तर कॅग त्यावर आक्षेप घेऊ शकते. मला फायनान्स समजत असल्यामुळे यापूर्वी कधीही आक्षेप घेतला नाही."