थिटेवाडी बंधाऱ्याने गाठला तळ; पाणी योजना अडचणीत
By Admin | Published: April 23, 2016 12:58 AM2016-04-23T00:58:29+5:302016-04-23T00:58:29+5:30
शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या थिटेवाडी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावली आहे.
शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या थिटेवाडी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. बंधाऱ्यावरून जवळच्या गावांना पाण्याची योजना राबविण्यात आल्या असून, काही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर आदी भागाला थिटेवाडी बंधाऱ्याचा मोठा फायदा होत असतो. मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी एप्रिलपर्यंत काहीसा पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याने फेब्रुवारीत होणारी पिण्याच्या पाण्याची धावपळ काहीशी लांबली असली, तरी मे महिन्यात या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे.
या भागातील विहिरींची पाणीपातळी खालवली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवर टँकरची मागणी होत आहे. काही ग्रामपंचायतींनी टँकरचे प्रस्ताव दिले आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या भागात गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर झालेले के. टी. बंधारे, छोटी तळी व काहीसे शेततळ्यांनी शेतीला मोठा आधार मिळाला आहे. थिटेवाडी धरणातील गाळ उपसण्याची मागणी या भागातून होत आहे.