रुप पालटलं आणि ठाकरवाडी आनंदानं उजळून निघाली..!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:42 PM2019-02-05T16:42:37+5:302019-02-05T16:45:26+5:30
हाती घेतलेल्या मोहिमेमुळे काही दिवसांतच वस्तीचा कायापालट केला.
चासकमान: कान्हेवाडी बुद्रुक(ता.खेड) येथे येथील ठाकरवाडीतील आदिवासी बांधवांच्या जीवनातील मरगळ दूर करण्यासाठी डॉ. माधव साठे यांनी वस्तीतील घरांना रंग देऊन कायापालट करण्याच्या संकल्पाकडे एक पाऊल टाकले. एखाद्या नववधूसारखी दिसणारी घरे पाहून आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप बोलका होता. हे अतिशय सुंदर काम डॉ. माधव साठे व मुंबईच्या माता बाल संगोपन संस्था कंपनी यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. तसेच कान्हेवाडी बुद्रुक हे गाव लोकसहभागातून संपूर्ण सौर ऊर्जेवर चालत असून देशातील पहिली सोलर आदिवासी वस्ती म्हणून कान्हेवाडी येथील वरची ठाकरवाडी ठरली.
ठाकरवाडीतील आदिवासी बांधवाची घरे १००% सोलर झाली आहे. या कामासाठी थेमिस कंपनी व चंद्रकांत गेणभाऊ सहाणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. सुमारे ५० घरांची आदिवासी लोकवस्ती शंभर टक्के सौर ऊर्जेवर करण्यात आली. अद्याप रस्ते,पाणी, वीज, अशा मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या गावाला मुंबई माता बाल संगोपन संस्थेचा सेक्रेटरी डॉ माधव साठे यांनी भेट देऊन या संस्थेने गावाचे रुप पालटण्यासाठी विचार सुरू केला. मग हाती घेतलेल्या मोहिमेमुळे काही दिवसांतच वस्तीचा कायापालट केला. कान्हेवाडी बुद्रुक गावातील नागरिकांबरोबर विचारविनिमय केल्यानंतर संपूर्ण गाव सोलर वर आधारित करण्याचा निर्धार के ला.थेमीस मेडिकल कंपनीसमोर हा विचार मांडला आणि त्यांनी त्यांच्या सीएसफंडातून हे काम करण्याची तयारी दर्शविली . प्रथम येथील लोकांची पाण्याची अडचण सोडविण्याचा विचार करून ग्रामस्थांनी विहीर बांधली व मुंबई माता बाल संगोपन संस्थेने पाण्याचे नळ आणि टाक्या उपलब्ध करून दिल्या.व ग्रामस्थांनी श्रमदानाने पाईप लाईनची जोडणी करून टाक्या बसविल्या. ठाकरवाडीतील शाळा ई- लर्निंगच्या माध्यमातून डिजिटल झाली आहे. शाळेलाही ग्रामसहभागातून सोलर पॅनल मिळाले आहे. गावातील रस्त्यावरील सोलर दिवे हे रोटरी क्लबच्या माध्यमातून देण्यात आले आहे.यावेळी डॉ माधवराव साठे, स्वाती शिंदे, सरपंच गंगुबाई आंबेकर, उपसरपंच मारुती सहाणे, ग्रामसेवक निलेश पांडे, उद्योजक चंद्रकांत सहाणे, दत्तात्रय कोबल, हर्षद कोबल, राहुल सहाणे, दिपक कोबल,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान सहाणे यांनी केले.