माळेगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी
By Admin | Published: March 9, 2017 04:11 AM2017-03-09T04:11:38+5:302017-03-09T04:11:38+5:30
माळेगाव (ता. बारामती) येथे दोन गटांत तुंबळ मारामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या संदर्भात दोन्ही गटांच्या वतीने परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सांगवी : माळेगाव (ता. बारामती) येथे दोन गटांत तुंबळ मारामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या संदर्भात दोन्ही गटांच्या वतीने परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र, काही महिन्यांपासून माळेगाव परिसरात मारामारीचे प्रकार सातत्याने घडत आहे. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या मारमारीत लोखंडी गज, फायटर, लाकडी दांडक्याचा वापर केला. त्यामुळे दोन्ही गटांतील तरुण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी माळेगाव दूरक्षेत्र पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. स्वप्निल दिलीपराव तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मंगळवारी रात्री दुकान बंद करीत असताना आरोपी रोहन चव्हाण, तुषार खोमणे, दीपक चव्हाण (रा. शारदानगर, माळेगाव कॉलनी, ता. बारामती) हृषीकेश चव्हाण, संग्राम चव्हाण, छोटू बाबजी खोमणे (रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती) यांच्यासह ७ ते ८ अनोळखी तरुणांनी दुकानासमोर येऊन ‘तुम्हाला लय माज आला आहे का?’ असे म्हणून रोहन चव्हाण याने त्याच्या हातातील फायटरने स्वप्निल तावरे याच्या डाव्या डोळ्याच्या वर मारून दुखापत केली. हृषीकेश चव्हाण याने त्याच्या हातातील गज कपाळावर मारून दुखापत केली. तर, दीपक चव्हाण याने फिर्यादीच्या पायावर गज मारला. दुकानाची नासधूस केली. तुषार खोमणे याने हाताने-पायाने पोटात लाथाबुक्क्या मारल्या. त्यानंतर फिर्यादीच्या घरी गेले असता फिर्यादीचे वडील दिलीपराव तावरे यांना लाकडाच्या दांड्याने मारहाण केली.
वडिलांना मारहाण करीत असल्याचे पाहून स्वप्निल त्यांना त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या पायावर तलवारीने वार केला. त्याचबरोबर त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, बदाम बळजबरीने ओढून नेला. स्वप्निलची आई वैशाली तावरे यांनादेखील धमकी देऊन मारहाण केली. त्यांना ‘तुझा दुसरा मुलगा कुठे आहे? त्याला खल्लास करायचा आहे’ अशी धमकी दिली. असे म्हणून त्यांच्या गळ्यातील २ तोळ्यांचे गंठण (किंमत ५० हजार रुपये) बळजबरीने ओढून नेले. सर्वांनी हातातील काठ्यांनी व बुक्क्यांनी जबर मारहाण करून बाहेर सर्व जाताना फिर्यादीचा भाऊ प्रसाद तावरे याला ठार मारण्याची धमकी देऊन घराबाहेर असलेल्या मोटारसायकल हीरो होंडा (एमएच १२/१७९२)ची खोपडी फोडली. सर्वांनी वस्तीवर येऊन जमलेल्या लोकांना शिवीगाळ करून जमावावर दगडफेक केली. त्यात सुवर्णा शिवाजी गिरी यांच्या हाताला जबर मार लागला. पुढे ते सर्व जात असताना त्यांनी आणलेल्या मोटारसायकलवर बसून संभाजीनगरच्या बाजूने निघून गेले. जाताना मोटारसायकल (एमएच ४२-एम ९१२९)वरून अरुण पंढरीनाथ जगताप यांच्या घरात घुसून त्यांची बायको व मुलगी प्रिया यांना धक्काबुक्की करून, मुलगी प्रिया हीला दगड फेकून मारून जगताप यांची बाळंतपणासाठी आलेली दुसरी मुलगी पूजा राहुल शिंदे हिच्या गळ्यातील गंठण चोरून नेऊन त्यांच्याही मोटारसायकलची तोडफोड केली. या दोन्ही प्रकरणी तावरे यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, या घटनेपूर्वी शारदानगर (ता. बारामती) येथील डायमंड हॉटेलसमोरील लोखंडी पुलावर फिर्यादी रोहन राजेंद्र चव्हाण (वय २१, धंदा मेस, रा. शारदानगर, माळेगाव कॉलनी) दि. ७ मार्च रोजी ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे साथीदार किरण शंकर खोमणे, हृषीकेश हनुमंत चव्हाण, दीपक चव्हाण नागेश पवार हे लोखंडी पुलावर बोलत उभे होते, त्या वेळी आरोपी अतुल शशिकांत तावरे याच्या हातात तलवार, नीलेश लोणकर हातात गज, सोन्या गोसावी व धनंजय बर्गे यांच्या हातात गज, तसेच बबलू लोणकर हातात लाकडी दांडा, कल्याण अर्जुन तावरे व किरण शिंदे यांच्या हातात लाकडी दांडा (सर्व रा. माळेगाव बुद्रुक) तसेच बारक्या तावरे (रा. सांगवी, ता. बारामती) याच्या हातात लाकडी दांडा इतर अनोळखी तीन जण, हे सर्व पाच मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी अतुल तावरे याने त्याच्या हातातील तलवारीने किरण शंकर खोमणे याच्या कानाच्या पाठीमागून डोक्यात मारली व कपाळावरही मारली, तसेच प्रसाद तावरे याने त्याच्या हातात असणाऱ्या सत्तूरने किरण खोमणे याच्या पाठीत मारला. धनंजय बर्गे याने त्याच्या हातात असणाऱ्या लोखंडी गजाने पाठीवर मारले. तर, कल्याण तावरे व बबलू लोणकर यांनी पाठीत व लाकडी दांड्याने मारहाण केली. (वार्ताहर)
डोक्यात वार झाल्याने एकाची प्रकृती गंभीर...
मारहाण रोखण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादी रोहन राजेंद्र चव्हाण यांच्या डोक्यात नीलेश लोणकर याने गजाने मारहाण केली. पप्पू भापकर व राहुल तावरे यांनी त्यांच्या हातातील लोखंडी गजाने, लाकडी दांडक्याने डाव्या पायाच्या गुडघ्यावर व उजव्या हातावर मारहाण केली. इतर अनोळखी तीन इसम व सोन्या गोसावी यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सत्तूर, तलवार आणि दांडक्याने मारहाण केल्याने राजेंद्र चव्हाण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड करीत आहेत.