ठाणे-बारामती एसटी बस जळून खाक
By admin | Published: May 10, 2015 04:57 AM2015-05-10T04:57:15+5:302015-05-10T04:57:15+5:30
मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर येथून जवळच असलेल्या कुणे पुलाजवळ राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची शिवनेरी बस
लोणावळा : मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर येथून जवळच असलेल्या कुणे पुलाजवळ राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची शिवनेरी बस शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत खाक झाली. बसमध्ये ४२ प्रवासी होते. दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी या घटनेतून सुखरूप वाचले.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथून बारामतीला जाणाऱ्या बारामती डेपोच्या बसला ( क्र. एमएच-०७ / सी-७५३८ ) खंडाळा घाट संपल्यानंतर कुणे पुलाजवळ अचानक आग लागली. तेथून जाणाऱ्या एका वाहनाच्या चालकाने बसचालकाला बसला आग लागल्याची माहिती दिली. चालक पी. डी. कवडे व वाहक ए. बी. बुट्टे यांनी प्रसंगावधान राखत याबाबत प्रवाशांना कल्पना देत बस मार्गालगत सर्व्हिस लेनवर उभी केली. नंतर प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन साहित्याची तमा न करता बसमधून उड्या मारल्या. प्रवाशी खाली उतरल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कुळकर्णी, अल्ताफ पठाण, दिलीप कुरंदळे, सुधाकर शिंदे आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने आग विझविण्यासाठी आयआरबीच्या अग्निशामक दलाला कळविले. खबरदारी म्हणून तेथील वाहतूक काही काळ रोखण्यात आली. दहा मिनिटांत आयआरबीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक दोन लेनवरून सुरू केली. पुन्हा आग विझविण्यासाठी आयआरबी व आयएनएस शिवाजीचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे विझविली. तोपर्यंत संपूर्ण बससह प्रवाशांचे साहित्य आगीत जळून खाक झाले होते. आग वाढत्या उष्म्याने व वाहन गरम होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. बसमधील प्रवाशांना चालक व वाहक यांनी महामंडळाच्या इतर प्रवाशी बसमध्ये बसवून दिले. लोणावळा एसटी आगाराचे वाहतूक नियंत्रक व्ही. व्ही. धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली.
(प्रतिनिधी)