ठाणे की सातारा ? ठरणार रविवारी
By admin | Published: October 14, 2015 03:34 AM2015-10-14T03:34:49+5:302015-10-14T03:34:49+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाट्य संमेलन आयोजनाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. नाट्य संमेलन आयोजित करण्यात सातारा शाखा प्रबळ दावेदार मानली जात असली
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाट्य संमेलन आयोजनाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. नाट्य संमेलन आयोजित करण्यात सातारा शाखा प्रबळ दावेदार मानली जात असली, तरी त्यावर येत्या रविवारी शिक्कामोर्तब होणार आहे. ठाणे शाखाही सध्या शर्यतीत आहे.
साधारणत: जानेवारी महिन्यात नाट्य संमेलन भरविले जाते. यंदाचे नाट्य संमेलन भरविण्यासाठी जळगाव, नागपूर, कोल्हापूर, ठाणे आणि सातारा या शाखांनी निमंत्रण दिले आहे. ज्या शाखांनी निमंत्रण दिले आहे, त्या शाखा संमेलन भरविण्यास सक्षम आहेत की नाही, याची पाहणी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भातील अहवाल नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे पाठविण्यात आला आहे.
सध्या ठाणे आणि सातारा या दोन शाखांमध्ये संमेलन भरविण्यात चढाओढ लागली आहे. सातारा शाखेला पुण्यातील दोन पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट
दिली आहे. बेळगाव संमेलनाची धामधूम सुरू असताना नाट्य
परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी
यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य करणार नाही,
अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडल्याने बेळगावातील आयोजकांनी संमेलन रद्द करू, असा पवित्रा घेतला. त्या वेळी मध्यवर्ती शाखेच्या मदतीला सातारा शाखेचे पदाधिकारी धाऊन आले. १५ दिवसांत संमेलन घेऊन दाखवितो, असा विश्वास त्यांनी मध्यवर्ती शाखेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
त्या वेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि कार्यवाह दीपक करंजीकर यांनी पुढल्या वर्षी यजमानपद साताऱ्याला देऊ, असे आश्वासन दिले होते.
मराठी भाषक आणि सीमावादाचा प्रश्न नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर मांडला जावा, असा आग्रह बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी धरला होता; पण स्थानिक प्रशासनानेच नियमांच्या एवढ्या भिंती उभ्या केल्या, की मराठी भाषकांचे सर्व मुद्दे बाजूला ठेवून संमेलन पार पाडावे लागले.
चार-पाच वर्षांपासून संमेलन मिळावे, अशी सातारा शाखेची
मागणी आहे; पण प्रत्येक वेळी
काही ना काही कारणे देऊन
संमेलन देण्याचे परिषदेकडून
टाळले जात आहे; पण यंदाच्या
वर्षी सातारा शाखेकडे पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनाचे भक्कम पाठबळ आहे. असे असले, तरी ऐन वेळी काय होईल, हे कुणी सांगू शकत नाही.
नागपूर शाखेनेही संमेलनाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत; त्यामुळे काही सांगता येत नाही, असे खासगीत काही पदाधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)