कृतज्ञता सोहळा : माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला कॉम्प्युटर लॅब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 01:33 AM2018-10-05T01:33:23+5:302018-10-05T01:33:44+5:30
कृतज्ञता सोहळा : शिक्षक मानसिंग जावळे यांचा सत्कार
कुरकुंभ : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतरदेखील जिथे आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे व दौंड तालुक्याच्या दुष्काळी भागातील जिरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माजी विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर लॅब तयार करून दिली. त्यामुळे भावी पिढीला जगाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञान व खासगी शाळेच्या बरोबर अभ्यास करण्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करून दिला आहे.
जिरेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. या वेळी शाळेला कॉम्प्युटर लॅब देण्याबरोबरच शाळेला लाभलेले पहिले शिक्षक मानसिंग जावळे यांचादेखील सत्कार ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता जांभले व त्यांचे सहकारी शरद भंडलकर तसेच अन्य माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वरील भेट देण्यास पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाला सरपंच अलका सूर्यवंशी, उपसरपंच बाळासाहेब भंडलकर, सुवर्णा सूर्यवंशी, रघुवीर पाटसकर, मुख्याध्यापक तात्याबा खोरे, वैशाली वाबळे, शोभा गायकवाड, स्वाती जराड, दीपक कदम, केंद्रप्रमुख दिलीप वनवे, गोरख मचाले, तानाजी यादव, नवनाथ गाढवे, माजी शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या.