ग्रामपंचायत निवडणुकीच्या आकसातून थार जीप पेटवली; हवेली तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 PM2021-01-08T17:26:55+5:302021-01-08T17:27:47+5:30
अज्ञातांनी निवडणुक प्रचाराचा राग मनात धरुन गाडीवर पेट्रोल ओतून जीपला आग लावून पेटवून दिली आहे.
उरुळी कांचन : ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराचा राग मनात धरुन कोरेगाव मूळ (ता.हवेली ) येथे एका कार्यकर्त्याची महिंद्रा थार जीप पेट्रोलने पेटून देण्याचा प्रकार गुरुवार (दि.७) रोजी रात्री घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी मंगेश सुरेश शितोळे( वय- ३५ , रा.इनामदार वस्ती , कोरेगाव मूळ , ता.हवेली ) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या मालकीची महिंद्रा थार जीप आगीत पूर्ण भस्मसात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कोरेगावमूळ येथे महिंद्रा थार जीप गुरुवारी ७ रोजी रात्री उभी केली होती. अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी निवडणुक प्रचाराचा राग मनात धरुन गाडीवर पेट्रोल ओतून जीपला आग लावून पेटवून दिली आहे. या आगीत जीप भस्मसात झाली असुन या मध्ये चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
निवडणूक काळात घडलेल्या या सुडाच्या घटनेचा पोलिसांनी अनेक मार्गांनी तपास सुरू केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी हे करीत आहेत.